Sudhir Mungantiwar : आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही, भाजप नाक खुपसणार नाही : सुधीर मुनगंटीवार
आजपर्यंत आमच्याकडे शिंदे गटाकडून कोणताच प्रस्ताव आला नाही. मग कारण नसताना त्यांच्या अंतर्गत कलहामध्ये भाजपने नाक खुपसायचं काही कारण नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
Sudhir Mungantiwar : जोपर्यंत खरी शिवसेना कोणाची, शिवसेनेचा गट कोणता, हिंदुत्वाच्या विचारावर जाण्याची कोण हमी देतंय, याचं विश्लेषण होतं आहे. या विश्लेषणाच्या आधारावर जर कोणी प्रस्ताव दिला तर विचार केला जाईल, असं वक्तव्य भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. आजपर्यंत या संदर्भात कोणताच प्रस्ताव आला नाही. मग कारण नसताना त्यांच्या अंतर्गत कलहामध्ये भाजपने नाक खुपसायचं काही कारण नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाली यात तथ्य नाही
आमची जबाबदारी जनतेचे प्रश्न सोडवण्याची आहे. कोणीही आमच्याकडे आलेलं नसताना नाक खुपसायची जबाबदारी आमची नाही. राज्यातील नेत्यांना नांदेडच्या पुराची चिंता नाही पण आसामच्या पुराची चिंता असल्याचे म्हणत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यात काही तथ्य नाही. या चर्चेमागे ते आहेत ज्यांना आमदार फुटण्यात आपली चूक नाही हे सिध्द करायचं आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडीत असेल आणि गुंडांचं राज्य येणार असेल तर त्याला गृहमंत्री निश्चित जबाबदार आहे. गृहमंत्र्यांनी जनतेच्या हितासाठी काम करावं नाही तर इतिहास त्यांना माफ करणार नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत.