'ही राष्ट्रवादी 'साहेबां'च्या विचारांची नाही', चित्रा वाघ यांचा 'राष्ट्रवादी'वर नाही पण शरद पवारांवर विश्वास!
आताची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही असा टोला लगावत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपणही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केले आहे. साहेबांच्या राष्ट्रवादीत काम केलं आहे. त्यामुळे ही साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही हा माझा विश्वास आहे, असं वाघ म्हणाल्या.
पंढरपूर : आताची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही असा टोला लगावत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपणही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केले आहे. साहेबांच्या राष्ट्रवादीत काम केलं आहे. त्यामुळे ही साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही हा माझा विश्वास आहे, असं वाघ म्हणाल्या. साहेबांच्या राष्ट्रवादीत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळाला असता. आज शेकडो भगिनी कोरोनाच्या संकट काळातही आपल्या प्रश्नासाठी घरदार सोडून रस्त्यावर बसल्यात हे साहेबांनी होऊ दिले नसते. मात्र आज जे चालले आहे ते साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी असती तर झालं नसतं अशा शब्दात राष्ट्रवादीवर टीका करत चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्य़ावर मात्र विश्वास व्यक्त केला.
अकलूजमध्ये अकलूज नगर परिषद आणि नातेपुते नगर पंचायतसाठी गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चित्र वाघ आल्या होत्या. जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे. जर पूर्ण वेळ अधिवेशन घेतले तर भाजप यांना फाडून खाईल याची भीती वाटत आहे. त्यामुळेच सरकार असे वागत असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरील आपला विश्वास व्यक्त केला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय कारणाने अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतींना नगर परिषद आणि नगर पंचायत करण्यापासून रोखले जात असल्याने हे आंदोलन सुरु आहे. अकलूज आणि नातेपुते येथील ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यासाठी लागणारे सर्व शासकीय कागदपत्रे आणि मंजुऱ्या मिळाल्या असताना केवळ राजकीय आकसापोटी आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या विरोधामुळे घोषणा अडवून ठेवल्याने दोन्ही गावातील शेकडो ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरु केले आहे.
गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेले जनतेचे आंदोलन शरद पवार यांनी लगेच सोडवले असते असा विश्वासच चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला आहे, मात्र कालच खुद्द शरद पवार या आंदोलनस्थळापासून केवळ 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूर येथे एका विवाहाला येऊन गेले आणि त्यांना अकलूजमधील घडामोडी माहित नाहीत म्हणणे धाडसाचे ठरेल. अशावेळी केवळ 20 वर्षे राष्ट्रवादीत राहून भाजपत गेल्यावर 'साहेबां'च्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी थोडी माहिती घेतली असती तर त्यांना कालचा शरद पवार यांचा दौराही समजला असता आणि मग त्यांनी हा विश्वास दाखवला असता का? हाच प्रश्न अकलूज मधील ग्रामस्थांना पडला आहे.