काँग्रेस पक्षात नाना भाऊ, विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती; भाजप नेते आशिष देशमुखांची बोचरी टीका
Nagpur News : काँग्रेस पक्षात नाना भाऊ, विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती असल्याची टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी विजय वडेट्टीवारांवर करत तोफ डागली आहे.
Nagpur News नागपूर : लाडकी बहीण योजना हि लाडक्या खुर्चीसाठी आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर केली होती. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या या टीकेला आता भाजपनेही प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षात नाना भाऊ, विजय भाऊ एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती असतांना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी दुसऱ्यांवर टीका करत बसण्यापेक्षा काँग्रेस पक्षात काय सुरू आहे त्याकडे लक्ष घालावे असे म्हणत भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी विजय वडेट्टीवारांवर तोफ डागली आहे.
राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेची सध्या राज्यभर चलती आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना आपला अर्ज दाखल केला असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारकडून 19 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशातच या योजनेवरुन रोज नवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून सध्या राजकीय वादंग सुरू आहे. नुकतेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला आता भाजपकडूनही पलटवार केला जात आहे.
1 कोटी महिलांचे अर्ज दाखल
राज्य सरकारने महिला भगिंनींना खुश करत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यानुसार, 21 ते 65 वर्षे वयापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात मिळणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून सध्या या योजनेची माहिती गावपातळीपासून सर्वच स्तरावर पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळेच, योजनेला महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 1 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. या योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन सणाच्या पाश्वभूमीवर बँक खात्यात जमा होणार आहे.
समाजाला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या सोडा- विजय वडेट्टीवार
आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. अशातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणले की, सरकारने आज दोन्ही समाज समोरासमोर उभे केले आहेत. एकाचे नेतृत्व मनोज जरांगे तर एक दुसऱ्याचे नेतृत्व लक्ष्मण हाके करत आहेत. दोन समाजात सरकारने दरी निर्माण केली आहे. मात्र जाती जातीत भांडणे लावून महाराष्ट्राचा विकास होणार नाही. सरकार म्हणून जे करत आहे ते योग्य नाही. परिणामी त्यांनी समाजाला न्याय द्यावा अथवा खुर्च्या सोडाव्या, असा इशारीही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या