देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र, कोरोना काळात राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना मदत न मिळणं हे वेदनादायी
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच जात असताना महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी चांगली नाही.
मुंबई : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच जात असताना महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी चांगली नाही. रुग्णसंख्या काही अंशी कमी झालेली असली तरीही कोरोनाचं संकट आणि दर दिवशी सापडणारे हजारो नवे रुग्ण मात्र आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढील अडचणी वाढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील एकंदर कोरोना परिस्थिती आणि त्याचा देशातील परिस्थितीशी असणारा संबंध यावर भाष्य करणारं एक पत्र भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलं आहे.
मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेली पत्र आणि काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याला अनुसरुन आपण या पत्रातून काही महत्त्वाचे मुद्दे मांडत असल्याचं फडणवीस यांनी या पत्रातून सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे.
सध्याच्या घडीला देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 22 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर, एकूण मृतांपैकी 31 टक्के मृत्यूही महाराष्ट्रातूनच झाले आहेत. सक्रिय रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास तब्बल 14 टक्के रुग्णांवर महाराष्ट्रात उपचार सुरु आहेत. ही सर्व आकडेवारी सादर करत देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांचं लक्ष महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीकडे वेधलं. देशातील कोरोना स्थितीमध्येत महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा आग्रही सूर त्यांनी आळवला.
देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब; राहुल गांधीची केंद्र सरकारवर जहरी टीका
महाराष्ट्राला कोरोनाच्या धर्तीवर विविध आरोग्य सुविधा आणि उपकरणांच्या रुपात दिली जाणारी मदत पाहूनही काहीजण आपलं अपयश लपवण्यासाठी मोदी सरकारवरच टीका करतात, जणू हेच त्यांचं अंतिम लक्ष्य आहे.
My letter to @INCIndia President Smt Sonia Gandhi ji..
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 15, 2021
कांग्रेस अध्यक्षा मा. श्रीमती सोनिया गांधी जी इन्हें मेरा पत्र.. pic.twitter.com/lLOH1AAF33
राज्य शासनावर निशाणा
स्थानिक सत्ताधारी आणि काही माध्यमं मुंबईलाच महाराष्ट्र समजत असल्याचा टोलाही फडणवीसांनी या पत्रातून लगावला. मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली असून, मृतांचा आकडा हा सातत्यानं आणि जाणिवपूर्वकपणे लपवला जात असल्याचा मुद्दा त्यांनी या पत्रातून अधोरेखित केला.
राज्यात कोरोनाचा कहर वाढत असतानाच काँग्रेसही एक भाग असणाऱी सत्ताधारी महाविकासआघाडी मात्र नागरिकांना कोणत्याही प्रकारे मदत करत नाहीये, ही बाब अतिशय वेदनादायी असल्याचं म्हणत फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या व्यवस्थापनाबाबत नाराजीचा सूर आळवला.