Bird Flu : बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू, 'अशी' घ्या काळजी
Bird Flu : ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये बर्ड फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
Bird Flu : ठाणे जिल्ह्यातील वेहळोली (ता. शहापूर) येथे बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील एक किलोमीटरचे क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात 17 फुब्रवारी 2022 पर्यंत 300 कोंबड्या आणि नऊ बदकांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा अहावाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासनाने काल अधिकृतरित्या ठाण्यात संसर्गग्रस्त क्षेत्र"घोषीत केले आहे. त्यानंतर पशुरोग अन्वेषण विभागाचे पथक शहापूर येथील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे आणि निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.
ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. या निर्बंधांनुसार वेहलोळी येथील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरामध्ये येणाऱ्या सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून पथकाच्या देखरेखीखाली 23 हजार 428 कोंबड्या, 1 हजार 603 अंडी, तीन हजार 800 किलो खाद्य आणि शंभर किलो शेल ग्रीट नष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून 17 फेब्रुवारी रोजी सर्व जिल्ह्यांमधील क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक सतर्कता बाळगण्याचे व चौफेर निगराणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पोल्ट्रीधारक आणि नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत स्वरूपात आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मृत पक्षांची संख्या वाढल्याचे लक्षात आल्यास तत्काळ जवळच्या पशुवैदयकिय रूग्णालयात याची माहिती दयावी,असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. याबरोबरच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री 18002330418 आणि पशुसंवर्धन आयुक्तालयातील कॉल सेंटर 1962 या नंबरवर फोन करून माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी घ्या काळजी?
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पक्षांना हात लावू नये, किंवा त्यांचे शवविच्छेदन करु नये. याबरोबरच या पक्षांची परस्पर विल्हेवाट लावू नये.
..तर बर्ड फ्लूचा विषाणू होईल निष्क्रीय
बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. अंडी किवा कोंबडीचे मांस 70 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिली आहे. शिवाय बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.