Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...
Maha IT Scam Amol Kale : शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाआयटी घोटाळ्याप्रकरणी आरोप केलेले अमोल काळे यांनी भूमिका मांडली आहे.
Maha IT Scam : मागील दोन दिवसांपासून महाआयटी घोटाळा प्रकरणात उल्लेख होत असलेले अमोल काळे यांनी माध्यमांकडे आपली बाजू मांडली आहे. देशाबाहेर पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले असून आपला राज्य शासनाचे कोणतेही कंत्राट घेतले नसल्याचे अमोल काळे यांनी स्पष्ट केले. महाआयटी घोटाळ्यातील आरोपी अमोल काळे यांना देशाबाहेर पळवून लावले असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लावला होता.
मागील दोन दिवसांपासून अमोल काळे यांचे नाव चर्चेत आले आहे. मागील भाजप सरकारच्या काळात 25 हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या नावाची सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमोल काळे यांना देशाबाहेर पळवून लावण्यात आल्याचा आरोप केला.
अमोल काळे काय म्हणाले?
आरोपांच्या फैऱ्या झडत असताना अमोल काळे यांनी निवेदन जाहीर करत आपली भूमिका मांडली आहे. अमोल काळे यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारचे मी कोणतेही कंत्राट घेतले नाही. माझ्या खासगी व्यवसायाची संपूर्ण माहिती माझ्या प्राप्तिकर विवरणात नमूद असल्याचे त्यांनी म्हटले. मी उद्योजक असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. माझ्या संदर्भात होत असलेली वक्तव्ये दिशाभूल करणारी असून बदनामी करणारी आहेत. अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
नवाब मलिक काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज महत्वाची माहिती दिली आहे. काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केलेले अमोल काळे आणि आणखी काही लोकं पळून गेले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यातील अमोल काळे लंडनला पळून गेले आहेत तर बाकीचे दुबईला पळून गेले आहेत आता केंद्राच्या मदतीने त्यांना माघारी आणा, असं मलिक यांनी म्हणाले.