वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी पालखी मार्गाचे भूमिपूजन आता पंतप्रधान करणार
वारकरी संप्रदायाला खुश करण्यासाठी पालखी मार्गाचे भूमिपूजन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
पंढरपूर : लाखो वारकरी पायी येणार्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे शनिवार 30 ऑक्टोबर रोजी होणार भूमिपूजन पुढे ढकलले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचे समजते. पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरु होते. याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार होते. मात्र, नितीन गडकरी हे नेहमी प्रोटोकॉल पाळतात आणि लाखो वारकऱ्यांना खुश करणारा हा कार्यक्रम असाच झाला असता तर राज्यातील आघाडी सरकारनेही कार्यक्रम हायजॅक केला असता ही भीती भाजप खासदारांनी व्यक्त केल्यानेच आता पंतप्रधान मोदींना पाचारण करण्याचा घाट भाजप नेत्यांनी घातला असल्याची कुजबुज सुरु आहे.
यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची नामुष्की केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयावर आली आहे. आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. एकूण 8 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे जवळपास 40 टक्के काम पूर्ण झाल्यावर आता भूमिपूजनाचा घाट घालून वारकरी संप्रदायाला खुश करण्याचे काम सुरु आहे. हा रस्ता वारकर्यांसाठी करण्यात आला असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज दिंडीमधील प्रमुख महाराज मंडळी व अन्य महाराज मंडळी यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. पण आता हा मूळ कार्यक्रमाच रद्द झाल्याने आता पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत करावयाच्या कार्यक्रमाचे ठिकाण शोधण्यास प्रशासनाची सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची 8 किंवा 11 नोव्हेंबर रोजीची तारीख मिळणे अपेक्षित असून खरी अडचण आहे ती कार्तिकी यात्रेची. तब्बल दोन वर्षानंतर पंढरपूरमध्ये आता वारकरी संप्रदायाची कार्तिकी यात्रा भरविण्याचा हालचाली सुरु असून 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे. मात्र, पंतप्रधानांचा दौरा यात्रेपूर्वी जाहीर झाल्यास याचा मनस्ताप वारकरी संप्रदायाला सोसावा लागणार आहे. त्यामुळे आता भाजपसमोर ही देखील मोठी अडचण उभी राहिली असून ज्या वारकऱ्यांना खुश करण्यासाठी पंतप्रधानांना आणायचे तोच वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रेत अडचणी आल्यास नाराज होणार आहे.
यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन या कार्यक्रमाला दिल्लीतून उपस्थित राहून येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते कार्यक्रम करायच्या हालचाली देखील सुरु आहेत. भाजपातील केंद्रीय नेते मात्र मोदी यांना थेट पंढरपुरात आणून हे भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने आता गडकरी यांच्या मंत्रालयाला लाखो रुपये खर्चून हा उभारलेला मंडप कार्यक्रम न करताच काढावा लागणार आहे. किमान गडकरी यांच्या ऐवजी पंतप्रधान यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाल्यास आघाडी सरकारला किमान हा कार्यक्रम तरी हायजॅक करता येणार नाही एवढाच आनंद भाजप गोटात आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी 6 हजार 693 कोटी तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी 3 हजार 798 कोटी असा जवळपास दहा हजार कोटी रूपयाचा निधी या दोन्ही रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे.