चार वर्षांच्या चिमुकलीचं भाईंदरमधून अपहरण करुन बसमध्ये लैंगिक छळ, गोणीत भरुन वसईत रस्त्याच्या कडेला फेकलं
घरासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये खेळणाऱ्या एका चार वर्षीय मुलीचं अपहरण करुन, तिच्यावर बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वसई : मुंबईजवळच असणाऱ्या भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासला गेला आहे. घरासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये खेळणाऱ्या एका चार वर्षीय मुलीचं अपहरण करुन, तिच्यावर बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसंच तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. मुलीला जखमी अवस्थेत गोणीत भरुन, वसई हद्दीत रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं. वालीव पोलिसांनी तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने मुलीचे प्राण वाचले. भाईंदर पोलिसांनी आरोपी बस चालकाला तात्काळ अटक केली आहे.
20 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास भाईंदर पश्चिमेकडील राहणारी चार वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये इतर लहान मुलासोबत खेळत होती. काही वेळाने बसमधील सर्व मुले खाली उतरली. मात्र संबंधित मुलगी गाडीत खेळतच राहिली. त्यानंतर नराधम ड्रायव्हरने बस चालू करुन, बस मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नेली आणि गाडीतच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने लहानगीला जीव ठार मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नही केला. जखमी अवस्थेत बेशुद्ध झाल्यानंतर नराधमाने तिला प्लास्टिक गोणीत भरुन, वसईच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फादरवाडी येथे रस्त्याच्या कडेला फेकून दिलं.
चिमुरडीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून सायंकाळच्या सुमारास वालीव पोलिसांना गोणीत भरलेली पीडित मुलगी मिळाली. वालीव पोलिसांनी तत्परता दाखवत तिला तात्काळ वसईच्या डी एम पेटीट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले आणि तिला नवं जीवदानं दिलं.
ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. भाईंदर पोलिसांना मुलगी बसमध्ये खेळत असल्याचं कळलं. त्यांनी एक टीम बस चालकाला शोधण्यास रवाना केली. त्यात मुलगी वसईत मिळाल्याने पोलिसांनी कार्यत्परता दाखवत रात्रीच्याच सुमारास 34 वर्षीय आरोपी बस चालकाला मुंबईच्या सांताक्रूझ येथून अटक केली. आरोपीविरुद्ध भादंवि 376, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीही सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या: