Bhandara News : 'कामगार दिनी'चं ज्येष्ठ कामगाराला उपोषण करण्याची वेळ; न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप
Bhandara News : आंतरराष्ट्रीय कामगार दिनीच एका ज्येष्ठ कामगाराला उपोषण करण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळाला न्यायालयानं आदेश बजावला असताना या कामगाराचे पैसे थकीत ठेवल्याने हे आंदोलन करण्यात आलंय.
Bhandara News भंडारा : राज्यात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) साजरा केला जातोय. तसेच आज देशभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला जात आहे. असे असताना आजच्या दिवशीच एका ज्येष्ठ कामगाराला उपोषण करण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळात (ST Mahamandal) कार्यरत कामगाराला शासकीय नियमानुसार तीन महिन्याच्या आत थकीत रक्कम देण्याचा आदेश भंडारा कामगार न्यायालयानं बजावला होता. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही एसटी महामंडळानं या कामगाराला त्यांची थकीत रक्कम दिलेली नाही.
यात महामंडळानं न्यायालयाचा अवमान केला असून रक्कम तातडीनं मिळावी, यासाठी ज्येष्ठ कामगारानं थेट आज कामगार दिवसापासूनच भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रेमलाल गजभिये असं उपोषणाला बसलेल्या कामगाराचं नावं आहे. प्रेमलाल यांनी आज सुरू केलेल्या आंदोलनमुळे हा सर्व प्रकार उजेडात आला असून एसटी महामंडळ याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कामगार दिनीचं उपोषण करण्याची वेळ
प्रेमलाल गजभिये हे एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कंत्राटी कामगार म्हणून कामावर होते. मात्र, त्यांना शासकीय नियमांचा आर्थिक लाभ मिळत नसल्यानं त्यांनी भंडारा येथील कामगार न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कामगार न्यायालयाचे न्यायाधीश एफ. के. शेख यांनी 31 जानेवारीला निकाल देताना एसटी महामंडळाला आदेश दिलेत. यात प्रेमालाल यांना व्याजासह 7 लाख 60 हजार 354 रुपये देण्याचे आदेश असून ही रक्कम तीन महिन्यात देण्याचे आदेश आहेत. मात्र, तीन महिने लोटूनही एसटी महामंडळानं कुठलीही उपययोजना केली नसल्यानं प्रेमालाल गजभिये यांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा पुढे आला आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन अनेक ठिकाणी आज आंदोलन करण्यात आले. विदर्भातील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर नव्या येणाऱ्या सरकारला चेतावनी देण्याच्या दृष्टीने आणि विदर्भाचे स्वत्रंत राज्य तात्काळ निर्माण करण्याचे प्रयत्न म्हणून आंदोलन पुकारण्यात आले. विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाची सातत्यता कायम ठेवण्याच्या दृष्टीने आज 1 मे महाराष्ट्र दिनी गोंदिया शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आला. यावेळी विदर्भाला स्वतंत्र राज्य करण्यात यावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या