(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara Crime News : एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी फोडली चक्क दहा दुकानं; दोन संशयितांना अटक
Bhandara Crime : भंडारा शहरात काल 22 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारस एका रात्रीत चक्क 10 दुकानात चोरीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना अटक केली आहे.
Bhandara Crime News : भंडारा (Bhandara News) शहरात काल 22 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारस एका रात्रीत चक्क 10 दुकानात चोरीची घटना उजेडात आली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. यात सर्व दुकानांची शटर्स तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम आणि मुद्देमाल लुटून नेला आहे. हा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती भंडारा पोलिसांना (Bhandara Police) दिली.
एका रात्रीत घडलेला हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसलाय. शिवाय गेल्या काही वर्षातली ही भंडारा शहरातली सर्वात मोठी चोरी असल्याचेही बोलले जात आहे. परिणामी, पोलिसांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला असता, पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित चोरट्यांना अटक केली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेनं व्यापारी वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
एका रात्रीत फोडली चक्क दहा दुकानं
भंडारा शहरातील सात आणि जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीतील तीन असे दहा दुकानं चोरट्यांनी काल मध्यरात्री फोडलेत. ही घटना पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी फोडलेल्या दुकानात किराणा, मेडिकल स्टोअर्स, ज्वेलरी शॉप, स्वीट मार्ट, वाईन शॉप, पतंजली स्टोअर आदींचा समावेश आहे. मागील काही वर्षातील ही भंडाऱ्यातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. सर्व नऊ आरोपी तीन दुचाकिंवरून आल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. भंडारा पोलिसांची रात्री ग्रस्त नसल्यानं ही घटना घडल्याचा संताप व्यापारी वर्गात व्यक्त होत आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज बघून भंडारा पोलिसांच्या पथकानं नागपुरातून दोघांना ताब्यात घेतलं असून त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या चोरींमध्ये कितीचा मुद्देमाल किंवा रोख चोरट्यांनी लंबविली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून पकडण्यात आलेल्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ
या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, डॉग स्कॉडसह घटनास्थळी पोहोचले. ही सर्व दुकाने भंडारा शहरातील विविध भागातील आहेत. त्यातील काही दुकानांमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद झालीय. या फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी तपासाचे चक्र गातीमान करत आरोपींचा शोध सुरू केला असता, नागपुरातून दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास भंडारा पोलिसांनी व्यक्त केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या