Bhandara Hospital Fire | भानारकर दाम्पत्याच्या मदतीला बारामतीमधील डॉक्टर सरसावले, टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून संततीप्राप्तीचा खर्च उचलणार
भंडाऱ्यातील आगीत दहा बाळांचा मृत्यू झाला. यामधील सगळ्यात दु:खद कहाणी भानारकर दाम्पत्याची होती. मात्र आता या दाम्पत्याच्या मदतीला बारामतीमधील डॉक्टर सरसावले आहेत. भानारकर दाम्पत्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून संतती प्राप्त करुन देण्यासाठीचा खर्च उचलणार डॉक्टर उचलणार आहेत.
बारामती : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बाळांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश हादरला. भंडारा जिल्ह्यातील भानारकर दाम्पत्याला तब्बल 14 वर्षांनी संतती प्राप्त झाली होती. परंतु या आगीत त्या बाळाचाही मृत्यू झाला. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर बारामतीमधील डॉक्टर भानारकर कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले आहेत. या दाम्पत्याला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संतती प्राप्त करुन देण्यासाठी बारामतीमधील इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे आली आहे. याचा संपूर्ण खर्च बारामतीमधील डॉक्टर उचलणार आहेत.
भनारकर कुटुंबाची दुर्दैवी कहाणी हिरालाल आणि हिरकन्या भानारकर यांचे 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासून दोघांनी त्यांच्या घरी मूल जन्माला येईल असं स्वप्न पाहिले होते. मात्र, चार वेळा गरोदर राहून देखील हिरकन्या कधीच जिवंत बाळाला जन्म देऊ शकल्या नाहीत. चारही वेळेला त्यांच्या बाळाचा जन्मताच मृत्यू झाला.
यंदा वयाच्या 39 व्या वर्षी त्या पाचव्यांदा गरोदर राहिल्या. यंदा काहीही करुन आपलं बाळ जगला पाहिजे असा त्यांनी निर्धार केला होता. परिस्थिती गरीब, हातावर पोट असूनही या दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात उपचार केले, महागडी औषधं घेतली. त्यानंतर 6 जानेवारीला साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात हिरकन्या यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. हे बाळ जगलं यामुळे सर्व आनंदित होते. मात्र जन्माला आलेली मुलगी अवघ्या 1 किलो वजनाची होती. परिणामी तिला लगेच भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील SNCU ला दाखल करण्यात आले. तिथे ती दोन दिवस राहिली आणि 8 तारखेच्या रात्री लागलेल्या आगीत हिरकन्या आणि हिरालाल यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
भंडारा रुग्णालय आग : अनेक माता-पित्यांनी पोटच्या बाळांना मनभरून पाहिलंही नव्हतं
आधीचे चार वाईट अनुभव गाठीशी असलेल्या हिरकन्या आणि हिरालाल यांनी यंदा त्यांच्या घरी लहान मूल हसेल, खेळेल असे स्वप्न पाहिले होते. मात्र, शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारात त्यांनी आपलं सर्वस्व गमावलं.
भंडारा रुग्णालय आग : दिवस उजडताच दुःखद बातमी मिळाली अन् आईच्या पायाखालची जमीन सरकली!
भानारकर दाम्पत्याच्या मदतीला बारामतीमधील डॉक्टर सरसावले
एबीपी माझाने ही बातमी प्रकाशित आणि प्रसारित केल्यानंतर बारामतीमधील डॉक्टरांनी या दाम्पत्याला मदत करण्याचा निर्धार केला. या दाम्पत्याला आता टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अपत्यप्राप्तीचं सुख द्यावं यासाठी हे डॉक्टर सरसावले आहेत. टेस्ट ट्यूब बेबी ही महागडी उपचारपद्धती आहे. परंतु आगीच्या दुर्दैवी घटनेत चिमुकलीला गमावलेल्या भानारकर दाम्पत्याला पुन्हा अपत्य प्राप्त व्हावं यासाठी या ट्रीटमेंटचा सगळा खर्च बारामतीमधील डॉक्टर करणार आहेत.