Belgaum Election: बेळगावात महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे बिनविरोध, उपमहापौरपदीही भाजपचीच बाजी
बेळगाव महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली असून त्यामध्ये भाजपच्या रेश्मा पाटील यांनी बाजी मारली आहे.
बेळगाव : निवडणूक झाल्यानतंर तब्बल 14 महिन्यानंतर झालेल्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये (Belgaum Municipal Corporation Election) भाजपने बाजी मारली आहे. बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदासाठी निवडणूक होऊन त्यामध्ये भाजपच्या रेश्मा पाटील यांनी बाजी मारली.
बेळगाव महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली नव्हती. आता तब्बल 14 महिन्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली असून त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली.
महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या शोभा सोममाचे यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी पक्षातील नगरसेवकांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शोभा सोमणाचे यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे वैशाली भातकांडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये रेश्मा पाटील यांना 42 मते तर वैशाली भातकांडे यांना चार मते मिळाली.
Belgaum Municipal Corporation Election: तीन नगरसेवकांना प्रवेश नाकारला
निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा निकाल घोषित केला. महापौर आणि उप महापौर निवडणूक झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. महापौर, उपमहापौर निवडणुकीला सहा जण अनुपस्थित राहिले तर तीन नगरसेवक तीन मिनिटे उशिरा आल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी उशीरा आलेल्या नगरसेवकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली पण त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही.
सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजता महापौर-उपमहापौर निवडणुकीला प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. निवडणूक झाल्यानंतर निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला.
Belgaum Municipal Corporation Election: पक्षीय बलाबल
बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून 58 पैकी भाजपचे 35 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे दहा नगरसेवक असून एमआयएम पक्षाचा एक नगरसेवक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार नगरसेवक आहेत.
एकेकाळी महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होतं, बेळगाव आणि एकीकरण समितीचा महापौर हे समिकरण होतं. आता त्याच एकीकरण समितीचे केवळ चार नगरसेवक राहिले आहेत.
ही बातमी वाचा: