जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे; 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी देताना काही नवीन नियम दिले आहेत.
मुंबई : सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटीपार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यांसह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्स बंद राहतील, असं आधीच्या आदेशात म्हटलं होतं. मात्र, या निर्णयाला मोठा विरोध करण्यात आला होता. जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती पण जीम आणि ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे विरोध होत होता. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. पण अखेर काही नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.
तर हेअर कटींग सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील असं कालच्या आदेशात म्हटलं होतं. ते आदेश कायम आहेत. हेअर कटिंग सलून रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे, असं आदेशात म्हटलं आहे.
सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यावसाय देखील सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांनी केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांची आज दुपारी ऑनलाईन बैठकही झाली होती.महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यावसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे बैठक आयोजीत केल्याची माहिती महाराष्ट्र सलून & ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली होती.
दरम्यान, जिम बंद ठेवण्यासही नाशिक जिम ट्रेनर अँड ओनर्स असोसिएशनने नकार दिला होता. तसेच रस्त्यावर उतरण्यासोबतच आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जारी करत कठोर निर्बंध लागू केले होते. यामध्ये जिम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या लॉकडाऊनमधून अजून न सावरलेले आणि आर्थिक संकटात सापडलेले जिम चालक आणि ट्रेनर हे नाराज झाले होते. आहेत. सरकारविरोधात त्यांच्या मनात रोष निर्माण झाला होता. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण 350 जिम आहेत तर साडेतीन हजाराहून अधिक जिम ट्रेनर आहेत. या निर्णयामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येणार होती. त्यामुळे त्यांनी 50 टक्के उपस्थिती आणि दोन डोस झालेल्या व्यक्तींसाठी परवानगी द्या आणि जिम सुरू ठेवा अशी मागणी केली होती. अखेर त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: