आषाढी वारीच्या शासकीय पुजेआधी शेतकरी कर्जमाफीसह शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, 4 जुलैला पांडुरंगाला घालणार साकडं
आषाढी वारीच्या शासकीय पुजेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसह शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, असी मागणी स्वाभिमानी शेतकरी संगटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन संपुर्ण कर्जमुक्ती करावी. तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यावर अन्यायकारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना सुबुध्दी यावी यासाठी 4 जुलै रोजी पंढरपूर येथे जाऊन पांडूरंगास साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.
शक्तीपीठ विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले
आज राज्यातील 12 जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सविनय कायदेभंग करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य जनतेच्यावतीने पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलावर जवळपास 2 दोन तास राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करून शक्तीपीठ व सरकारच्या विरोधातील जनभावना दाखविण्यात आले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी शक्तीपीठ महामार्गामुळे प्रचंड मोठे नुकसान होणार असून सरकारला याबाबत गुडघे टाकण्यास भाग पाडणार असल्याची भावना सामान्य लोकांनी बोलून दाखवल्या.
सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहेत
महायुतीच्या वतीने निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आता सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीस टाळाटाळ करत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. एकीकडे कर्जमुक्ती करण्यास पैसे नसलेले फडणवीस कुणाचा तरी व्यवसाय वृध्दीगंत व्हावा, कुणाच्या तरी कंपन्यांची भरभराट व्हावी याकरिता राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेवर शक्तीपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती व शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी पांडुरंगाने फडणवीसांना द्यावी, या मागणीसाठी राज्यातील शेतक-यांच्यावतीने व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्यावतीने 4 जुलैला पंढरपूर येथे साकडे घालणार असल्याचे माहिती शेट्टी यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध होऊ लागला आहे. बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गासाठी 86,000 कोटीचा चुराडा होणार आहे. तर हजारो हेक्टर सुपीक जमीन ही या महामार्गामुळे बाधित होणार आहे. त्यातच शेतकऱ्यांना तुलनेत कमी मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः रान पेटवले आहे.



















