बीड पोलीस ॲक्शन मोडवर, 400 जणांना नोटीस, 16 गुन्हे दाखल; सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात टोकाच्या जातीय द्वेष पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत झाल्याचं दिसून आलं.
बीड : जिल्ह्यातील जातीय वादावर आता कायदेशीर कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी सोशल मीडिया (Social media) अकाऊंटवरही वॉच ठेवला आहे. बीड लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पाहायला मिळाला. तर, निवडणुका पार पडल्यानंतरही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने येथे मराठा आणि वंजारी असा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यातूनच हा वाद सोशल मीडियातून अधिक तीव्र होतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे, बीड पोलीस प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. बीड (Beed) जिल्ह्यात जातीय सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी (Police) कारवाईला सुरुवात केली आहे. त्याच, अनुषंगाने जिल्ह्यात 16 गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात टोकाच्या जातीय द्वेष पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियातील याच पोस्टमुळे अनेक ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला असून काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या आहेत. त्यातच, गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वंजारा समाजातील काही लोकांचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओतून एखाद्या विशिष्ट समाजातील दुकानातून खरेदी करु नका, अन्यथा 5 हजार रुपयांचा दंड असा फतवाच काढत असल्याचं दिसून येत आहे. यांसदर्भात एबीपी माझाने बातमी दिल्यानंतर आता पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केली आहे.
एबीपी माझ्याच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी थेट मुंडेवाडी गाव गाठलं होतं. मुंडेवाडीत जाऊन संबंधित व्हिडिओची चौकशी करुन ग्रामस्थांशी संवादही साधला. त्यामध्ये, गावात कुठलाही जातीवाचक वाद नसून कुणीही कशाचीही सक्ती न केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे, ग्रामस्थांची बैठक घेऊन गावकऱ्यांना सलोखा राखण्याचं आवाहनही पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्याकडून करण्यात आलं आहे. त्यानंतर, आता पोलिसांनी सोशल मीडियातून समाज विधातक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
400 जणांना नोटीसा
बीड पोलिसांनी आता सोशल मीडियावर वॉच ठेवायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जवळपास 200 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. तर, 316 पोस्टपैकी 263 पोस्ट सोशल मीडियातून काढून टाकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर ज्या पोस्ट वायरल झाल्या होत्या, आणि त्याचा परिणाम हा जातीय तेढ निर्माण करण्यासाठी झाला, त्या सगळ्या पोस्ट पोलिसांनी सोशल मीडियातून हटवल्या आहेत. एवढेच नाही तर येणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, म्हणून सोशल मीडियावर टोकाचे लिखाण करणाऱ्या 400 पेक्षा जास्त जणांना बीड पोलिसांनी नोटीसही जारी केल्या आहेत.
दरम्यान, एबीपी माझाने मुंडेवाडी गावामध्ये कशाप्रकारे मराठा विरुद्ध वंजारी समाजामध्ये द्वेष पसरवला जात होता हे उघड केल्यानंतर व्हायरल व्हिडिओत आरोपीला मुंडेवाडीतून केज पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा
Video: बजरंग सोनवणे म्हणाले, मुंडेवाडी माझ्याच तालुक्यातलं; बच्चू कडू म्हणाले, आम्ही गावात जाऊ
Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड