Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड
बीड लोकसभा निवडणुकीत जाती-पातीचं राजकारण झाल्याचं शिक्कामोर्तब झालाय. कारण याच राजकारणाचे पडसाद आता स्थानिक गावकऱ्यांमध्ये उमटू लागल्याचं दिसून येते आहे.
बीड : लोकसभा निवडणुकांतील प्रचारादरम्यान बीडमध्ये जातीय रंग पाहायला मिळाले. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कुठलाही सहभाग न घेता, ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा असे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्यामुळे, जरांगेंनी थेट भूमिका न घेता लोकसभा निवडणुकीत फारकत घेतली. मात्र, बीड हे मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा असल्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र बनले होते. त्यातच, बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. मात्र, या लढतीवेळी काही प्रमाणात मराठा-वंजारी वाद स्थानिक पातळीवर दिसून आला. तर, निवडणुकांनंतरही तो जातीय वाद पुन्हा उफाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, मराठा-वंजारी समाजात एकमेकांच्या दुकानातून खरेदी केल्यास दंड आकारण्यात येईल, असे सांगणारे काही व्हिडिओ समाजमाध्यमांतून समोर आले आहे. त्यानंतर, आता बीडचे पोलीस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीत जाती-पातीचं राजकारण झाल्याचं शिक्कामोर्तब झालाय. कारण याच राजकारणाचे पडसाद आता स्थानिक गावकऱ्यांमध्ये उमटू लागल्याचं दिसून येते आहे. दोन गावांतील वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी थेट मराठा समाजाच्या व्यक्तींकडून काही खरेदी करू नये, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, बीड लोकसभेतील जातीय संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येतंय. अचानक हे गावकरी संतप्त का झाले? कोणती शक्ती यामागे आहे? नेमकं कोण विष कालवत आहे? या अुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगत आहेत. त्यासंदर्भात आात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगे पाटील यांनी बाजू मांडली आहे.
पोलीस अधीक्षक मुंडेंवाडीत पोहोचले
लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत. त्यातच मुंडेवाडी गावात वंजारी समाजातील नागरिकांनी मराठा समाजाच्या व्यक्तीकडून खरेदी करू नये, असा निर्णय घेतल्याची बातमी एबीपी माझाने समोर आणल्यानंतर बीडचे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मुंडेवाडीत पोहोचले असून याबाबत अधिक तपास करत आहेत.
सुधीर मुनगंटीवार, देसाईंना सवाल
बीड मधील जातिवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही, आता मंत्री सुधीर मनगुंटीवार आणि शंभूराज देसाई यांनी याचे उत्तर द्यायला हवं. कारण, त्यांचं म्हणणं होतं की बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण होत आहे, किंवा त्यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याबाबत संवाद झाला पाहिजे, असे मुनगंटीवार आणि शंभूराज देसाई यांचं म्हणणं होतं. कोणी जातीवाद केला आणि कधी जातीवाद केला? आता कोण जातिवाद करतोय हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही, ते करणार नाहीत आणि मी होऊ बी देणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
मी जातीवाद होऊ देणार नाही - जरांगे
बीड जिल्ह्यातील सर्व मराठ्यांना माझं आवाहन आहे, शांततेत राहा, आता वेळ निघून गेलीय. यापूर्वी देखील मराठा शांत राहिला आहे. लोकसभा होऊन गेली आता विधानसभेला बघू. अगोदर कोणाचं नाव घेतलं नाही, त्यावेळेला नाव घेऊ, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. वंजारी आणि मराठा समाजाचे कधी कुणाचे बांध कापलेत? तुम्हाला मतदान केलं तर चांगलं नाही केलं तर वाईट ही कसली लोकशाही?. मी कधी ओबीसी मराठा जातीवादी केला. मात्र, ग्राउंड लेव्हलवर कोण्या ओबीसीसोबत मी जातिवाद केला हे दाखवा. सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले होते, धनुभाऊ आणि पंकजा मुंडे कधीही जातिवाद करत नाहीत आता हे काय आहे? असा सवालही जरांगेंनी विचारला आहे. त्या बहिण भावांना मी कधीच विरोधक मानलं नव्हतं, त्यांनी विनाकारण मला हिणवलं. मी बीड जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात जातीवाद होऊ देणार नाही. आम्ही जातीवाद करत नाही आणि हो देखील देणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले
मराठा समाजाने शांत राहावे
बीड जिल्हा संतांची भूमी आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही,आम्ही कधीच म्हणणार नाही ओबीसीच्या दुकानावर वंजारी समाजाच्या दुकानावर जाणार नाही. एवढे खालच्या दर्जाची विचार आम्ही ठेवणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. जिथे जिथे ओबीसी उमेदवारांसाठी मराठा आमदारांनी काम केले, यासाठीच का, आमच्या अंगावर घालण्यासाठी ओबीसीच्या उमेदवारांचे काम केले का ? असा प्रश्न (जाब) मराठा समाज त्यांना विचारणार आहे. मात्र, मराठा समाजाला विनंती आहे, सर्वांनी शांत राहा, त्यात काही मजा नाही, थोडी हवा असते, असेही पाटील यांनी म्हटले.
सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे - सोनवणे
मुंडेवाडी हे गाव चांगलं आहे, तेथील लोक जातीवादावर काम करणारे नाहीत. केवळ वंजाराच नाही, तर दलित, बौद्ध समाजही गावात आहे. माझ्या केज तालुक्यातील ते गाव असल्याने मला चांगलं माहिती आहे. यापूर्वीही त्या गावाने वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केलंय. मात्र, या गावाने अशा पद्धतीने टोकाचं आवाहन करणं हे चुकीचं आहे. माझं गावातील सर्वांनाच आवाहन आहे की, आपल्या संस्कृतीला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. बहुजन समाजात सर्वचजण आले, सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, असे बजरंग सोनवणेंनी म्हटले. या घटनांमागे जे कोणी असतील, त्यामागे प्रशासनाने डोळसपणे तपास केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. प्रशासन कुठं आहे, कलेक्टर, एसपी काय करतात?, असा सवालही सोनवणेंनी उपस्थित केला. तसेच, अशा गोष्टीत मी राजकीय कुणाला दोष देणार नाही, कुणाचं नाव घेण्याची माझी संस्कृती नाही. माझा सवाल प्रशासनाला आहे, असेही बजरंग सोनवणेंनी म्हटले.