Beed : जिल्ह्यात माफियाराज बोकाळल्याचा आणखी काय पुरावा हवाय; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सवाल
अंबाजोगाईचा कारभार अनागोंदी असून आपल्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वर मिळावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बीड : अंबाजोगाईच्या बांधकाम विभागात अनागोंदी कारभार असून कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या करून घेतात. त्यामुळे स्वरक्षणासाठी अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रिव्हॉल्वर देण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आमने-सामने आल्या आहेत. जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, "वास्तविक पाहता, अशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैव आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण कसलेही राहिले नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय, खोटया केसेस दाखल करणे, गुन्ह्यात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्सी हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत."
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, "गुंडांना पाठिशी घातले जात असून जिल्ह्यात कायद्याचा कसलाही वचक राहिला नाही, त्यामुळे हे लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्ह्यात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही. जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय?"
अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर खपवून घेणार नाही- धनंजय मुंडे
अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली असून या प्रकरणी श्री कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अभियंता श्री कोकणे यांना संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी वर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्ष-संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही असं ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
पंधरा दिवसांपूर्वी कोकणे हे अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले आहेत आणि रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या संरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली. पंधरा दिवसापूर्वी आलेले कोकणे यांना कोणी धमकी दिली नाही किंवा त्यांचा कोणासोबत वाद झालेला नाही. मात्र या ठिकाणचा कारभार अनागोंदी असून त्यामुळे मला त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकार्यांना रिव्हॉल्वर मागणीच एक पत्र दिल आहे.
महत्त्वाच्या बातम्या :