अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्याच्या तक्रारीची धनंजय मुंडेंकडून दखल, धमकावणाऱ्यांची पोलिसात तक्रार करण्याची सूचना
अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिला आहे.
अंबाजोगाई : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांच्या तक्रारीची दखल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घेतली आहे. बिलांवर सह्या करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याबाबत कोकणे यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अभियंता कोकणे यांना संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी वर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्याला कामांच्या देयक बिलांवर सह्या करण्यासाठी हातात कट्यार घेऊन धमकावले जाते, मला रिव्हॉल्व्हर द्या, अशी तक्रारवजा विनंती बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
कोकणे यांनी संबंधितांविरोधात पोलीसांत तक्रार द्यावी, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. याबरोबरच धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना दूरध्वनीवरून संपर्क करून अभियंते कोकणे यांना स्वतःहून संपर्क करून त्यांची तक्रार घ्यावी व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.
बीड जिल्ह्यात सर्वच विभागातील चांगले काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही सदैव आहोत. अधिकारी वर्गावर दबाव आणायचा किंवा तत्सम कोणताही प्रकार जिल्ह्यात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Beed : बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र
- Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट'
- Corona New Cases: देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 79 हजार 723 कोरोना रूग्णांची नोंद, ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही वाढ