Maharashtra Beed News : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, आरोपी फरार
Maharashtra Beed News : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील पट्टीवडगाव या ठिकाणी घडली आहे.
Beed News Update : बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी मुलीला त्रास देणाऱ्या विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली लहारे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचं नाव आहे.
दिपाली लहारे हिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्याच गावातीलच अकबर शेख हा तरूण त्रास देत होता. ती कॉलेजला जात असताना तिचा रस्ता अडवून अश्लील भाषा वापरून तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. याप्रकरणी दीपालीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला होता. त्यानंतर अकबर शेख याला दिपालीच्या वडिलांनी समज दिली होती. मात्र, तरी देखील तो दिपालीला त्रास देण्याचा थांबवला नाही.
दिपालीचे वडील एसटीमध्ये चालक असून ते पालघरमध्ये कर्तव्यावर असतात. त्यामुळे दिपाली, तिचा भाऊ आणि तिची आई पट्टीवडगाव या ठिकाणी राहतात. अकबर शेख याला वारंवार सांगून देखील त्यानं दीपालीला त्रास देणे थांबवलं नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री दीपालीची आई एका कार्यक्रमाला गेली असताना तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी दिपालीच्या आईने याबाबत बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ही घटना समोर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी अकबर शेख याच्या विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अकबर शेख हा फरार झाला असून बर्दापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खरात करत आहेत. विद्यार्थीनीला त्रास देणाऱ्या या रोडरोमिओला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नागरिकांतून संताप
दरम्यान, अंबाजोगाईतील या घटनेवरून नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून मुलींनी शाळेत जायचे की नाही, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या अशा रोडरोमिओंचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या विद्यार्थीनीच्या आत्महत्येमुळे आंबाजोगाईतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता समोर आला आहे. रोडरोमिओंच्या त्रासामुळे आला पालकांमध्ये आणि विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या