Beed: बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा, पंकजा मुंडे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
Beed: बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही असं पंकजा मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
बीड: जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना मिळत आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी कायदा-सुव्यवस्थावर वेगळी विशेष बैठक बोलवा असे पत्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवले आहे. ते पत्र गृहमंत्र्यांनी पोलीस महानिरीक्षकांना पुढे पाठवले आहे
बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या विषयावर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे
काय आहे पंकजा मुंडे यांचे पत्र?
गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड, परळी, अंबेजोगाई, माजलगांव, गेवराई सह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे. पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिले नाही. जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारीच्या वाढत्या घटना अतिशय चिंताजनक बाब बनली आहेत, अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ बीडच्या कायदा-सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करावी अशी आपणास विनंती आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha