Beed News : अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ, पोलीस हवालदाराच्या तक्रारीनंतर डीवायएसपी जायभायेंची चौकशी होणार
डीवायएसपी जायभाये यांनी हवालदाराला केलेल्या शिवीगाळ प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक चौकशी करुन अहवाल सादर करतील. त्यानंतरच डीवायएसपी सुनील जायभाये यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होईल हे ठरणार आहे.
बीड : बीडमध्ये पोलीस स्टेशनच्या आवारात हवालदाराला अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करणारे डीवायएसपी सुनील जायभाये यांची चौकशी होणार आहे. पोलीस महानिरीक्षकांनी अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक चौकशी करुन अहवाल सादर करतील. त्यानंतरच डीवायएसपी सुनील जायभाये यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होईल हे ठरणार आहे.
माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आवारात डीवायएसपी सुनील जायभाये आणि पोलीस हवालदार एस एच राठोड यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी डीवायएसपी सुनील जायभाये यांनी अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ आणि धमकी दिली होती, अशी तक्रार राठोड यांनी बीडचे पोलीस अधीक्षक एस एच राठोड यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. यानंतर पोलीस महानिरीक्षकांनी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी चौकशीचा अहवाल साद केल्यानंतर डीवायएसपी सुनील जायभाये यांच्यावर कोणती कारवाई करावी याबाबत निर्णय घेतला जाईल.
काय आहे प्रकरण?
माजलगावच्या पोलीस स्टेशनमध्येच सोमवारी (18 एप्रिल) दुपारी डीवायएसपी सुनील जायभाये आणि पोलीस हवालदार एस एच राठोड यांच्यात जुंपली. डीवायएसपी सुनील जायभाये हे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी काही लोकांना स्टेशनबाहेर सिमेंटच्या बाकड्यावर बसलेलं पाहिलं. याविषयी त्यांनी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना हे लोक इथे का बसले आहेत अशी विचारणा केली. त्यावर हे लोक तक्रार देण्यासाठी आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. या लोकांना तिथून उठवून ते सिमेंटचं बाकडं तोडा, असं डीवायएसपी जायभाये यांनी ड्युटीवर असलेल्या एस एच राठोड यांना सांगितलं. परंतु आपल्या पायाला दुखापत झाल्याने हे काम करत येणार नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. यावर डीवायएसपी जायभाये चांगलेच संतापले आणि राठोड यांना शिवीगाळ केली. यानंतर सिमेंटच्या बाकड्यावर बसलेल्या लोकांना उठवलं. शिवाय इतर कर्मचाऱ्याकडून सिमेंटचं बाकडं तोडून घेतलं.
यानंतर पोलीस हवालदार एस एच राठोड यांनी या संपूर्ण प्रकाराची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली. आता डीवायएसपी यांची चौकशी होणार असून त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे पाहावं लागेल.