एक्स्प्लोर
कार्यक्रम राष्ट्रवादीचा, निमंत्रित भाजप, क्षीरसागर बंधूंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान
बीडमधील कार्यक्रम राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा आहे. मात्र या कार्यक्रमात एकाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान दिलं आहे. बीडमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात क्षीरसागर बंधूंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री आहेत, तर पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. म्हणजेच कार्यक्रम राष्ट्रवादीचा, तर उपस्थिती भाजप नेत्यांची. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किंवा बॅनरवर कुठेही धनंजय मुंडेंचे फोटो किंवा नाव पाहायला मिळत नाही. म्हणूनच क्षीरसागरांनी धनंजय मुंडेंना खुलं आव्हान दिल्याची चर्चा बीडमध्ये रंगत आहे. बीडमध्ये आज होत असलेला हा कार्यक्रम तसा राष्ट्रवादीचा म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा. मात्र या कार्यक्रमात एकाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. दुसरीकडे या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री आज बीडमध्ये येत आहेत, तर पंकजा मुंडे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातल्या भाजपच्या सगळ्या आमदारांना याचं विशेष निमंत्रण देण्यात आलं असून जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्या आमदारांचे फोटो शहरांमध्ये लावलेल्या बॅनरवर स्पष्टपणे झळकत आहेत. 'दुष्मन का दुष्मन अपना दोस्त' या म्हणीप्रमाणेच विनायक मेटेंशी कायम दुरावा ठेवणाऱ्या बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे मात्र जयदत्त क्षीरसागरांसोबत कायम हितगुज करताना पाहायला मिळाल्या. म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांना राजकीय सहकार्य करण्याची भूमिका मांडणाऱ्या पंकजा मुंडेंनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. राष्ट्रवादीत धनंजय मुंडेंसोबत पटत नसल्यानेच सुरेश धस यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर क्षीरसागरही राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचं अनेक वेळा जाहीर कार्यक्रमातून दिसून आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमातून क्षीरसागरांना डावललं जात असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. म्हणूनच क्षीरसागर आणि मुख्यमंत्री तसेच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जवळीक वाढली. मुख्यमंत्री बीड नगरपालिकेच्या भुयारी गटार योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, पालिकेच्या सभागृहाचे नामकरण, निवाराग्रहाचे लोकार्पण, प्रधानमंत्री घरकुल योजनेचे भूमिपूजन अशा जवळपास साडेतीनशे कोटींच्या कामांचं लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाचं जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण देण्यात आलं नाही. इतकंच काय, या कार्यक्रमाच्या बॅनरवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचा साधा फोटोही पाहायला मिळत नाही. नाही म्हणायला, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे या दोन राष्ट्रवादीच्या आमदारांचे फोटो बॅनरवर आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांचा बीडच्या अंतर्गत राजकारणाशी थेट काहीच संबंध नाही. त्यामुळेच या कार्यक्रमातून क्षीरसागरांनी राष्ट्रवादीला आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमातून क्षीरसागरांना नुसतं डावललं जातंय, असं नाही. तर याउलट पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी पक्षाची संपूर्ण ताकद लावण्याचं काम खुद्द धनंजय मुंडे करत असल्याचं पाहायला मिळत होतं. जयदत्त क्षीरसागरही पहिल्यांदाच भाजपच्या नेत्यांसोबत दिसत आहेत, असं नाही. मागच्या दोन वर्षांपासून कधी मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीची आरती असो, की मुख्यमंत्र्यांना चहापानासाठी घरी घेऊन जाणं असो, क्षीरसागरांची भाजप नेत्यांसोबतची जवळीक लपून राहिलेली नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसला या कार्यक्रमातून खुलं आव्हान देणाऱ्या क्षीरसागर बंधूंविषयी पक्षाची भूमिका काय याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. आधी सुरेश धस आणि त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना होमपीचवर आव्हान दिल्याने स्वतःच्या जिल्ह्यातच मुंडेंना पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र सध्या बीडमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, जयदत्त शिरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना बीडला बोलावल्याने काही होत नाही, कोणी कोणाच्या घरी जाऊन जेवलं, कोणी कोणाच्या गाडीत बसलं, कोण कोणाच्या घरी गेलं, यामुळे पक्ष बदलत नसतो, पक्ष आवडला आणि प्रवेश केला, तरच पक्ष बदलतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र























