(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापूरचं पाणी बारामतीकरांनी पळवल्याचा आरोप, उजनी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात
उजनी पाणी प्रश्न पेटणार आहे. सोलापूरचं पाणी बारामतीकरांनी पळवल्याचा आरोप करत उजनी संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेसह इतर पक्षही अजित पवारांविरोधात उभे राहिले आहेत.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील दोन टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पासाठी 348 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाल्याने हे पाणी आता इंदापूर आणि बारामतीला जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळे उजनी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज दुपारी मोहोळ, कुर्डुवाडी अशा ठिकाणी याच्याविरोधात बैठक होणार असून आता उजनीचे पाणी पुन्हा पेटणार आहे.
सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्रीपद मिळवल्यापासून सोलापूरचे पाणी पळवण्याचा घाट घातल्याचे आरोप उजनी पाणी संघर्ष समितीने केला होता. यापूर्वी जेव्हा याच संदर्भातील आदेश निघाला तेव्हा सोलापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलने झाली आणि अखेर हा आदेश रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही योजना मंजूर करुन घेतल्याने याला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कुर्डूवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. तर मोहोळ येथे संघर्ष समितीचे अतुल खूपसे पाटील यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे .
लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असल्याने या प्रश्नावरुन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र आंदोलने झाली होती. अगदी पालकमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांची प्रतिमा उजनीमध्ये बुडवण्यात आली होती. गेल्या वर्षी 1 मे रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी उजनी धरणात उड्या मारुन जलसमाधी आंदोलन केले होते तर जनहित शेतकरी संघटनेचे भय्या देशमुख यांनी उजनी धरणावर 16 दिवस आंदोलन केले होते. यानंतर या आंदोलनाच्या दबावामुळे जलसंपदामंत्र्यांनीही योजना रद्द केल्याचे पत्रक काढल्यावर आंदोलन शांत झाले होते. आता पुन्हा यावर्षी तीच योजना जुनी योजना म्हणून समोर आणून सोलापूरचे पाणी इंदापर आणि बारामतीला पळवण्याचा प्रयत्न सुरु झाल्यावर सोलापूर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
या योजनेसाठी राज्य सरकारने 348 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कमी होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर लाकडी निंबोडी ही जुनी योजना असून हे नियोजनातील पाणी असल्याने सोलापूरकरांनी गैरसमज करुन घेऊ नये असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात बोलताना केले आहे. मात्र दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील पाणी नेण्यासाठी अजित पवार यांनी पालकमंत्र्यांना हाताशी धरुन आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही योजना रद्द करायला भाग पाडू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी दिल्याने आता राष्ट्रवादीतूनही संघर्षाचा नारा बुलंद होत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे संजय कोकाटे यांनीही राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्याचे पाणी नेऊ देणार नाही, असा इशारा देताना आपण पहिल्यांदा शेतकऱ्याचा मुलगा असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी याला विरोध करण्यासाठी संघर्ष करतील असे सांगितले. या निर्णयाच्या विरोधात उजनी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी पाण्याचा एक थेंबही उचलू देणार नसून आता सोलापूरचा संघर्ष बारामतीकरांसोबत असेल असा इशारा दिला आहे. बारामतीला इतके पाणी मिळत असताना पुन्हा दुष्काळी सोलापूरच्या पाण्यावर डाका टाकणे सहन केले जाणार नसल्याची भूमिका उजनी संघर्ष समितीने घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेस 2021-22 च्या दरसूचीवर आधारित 348 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ही योजना महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ अंर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उगम उजनी पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे असून पहिल्या टप्प्यात 50.10 मीटर, दुसऱ्या टप्प्यात 51.20 मीटर आणि 73.20 शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील 10 गावातील 4337 हेक्टर आणि बारामतीच्या सात गावातील 2913 हेक्टर अशा एकूण 7250 हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. यासाठी 0.90 अब्ज घन फूट पाणी कुंभारगाव येथून उपसा करणे प्रस्तावित आहे. वास्तविक हे पाणी उजनीचे नाही असे सांगणाऱ्यांकडून धूळफेक केली जात असून वरुन येणाऱ्या पाण्यामुळेच उजनी धारण भारत असते आणि याच पाण्याच्या आकडेवारीवर उजनी धरणाचे पूर्वी नियोजन केले आहे.