एक्स्प्लोर
बँका सलग आठ दिवस बंद असल्याचा वायरल मेसेज खोटा
एक ते आठ सप्टेंबर दरम्यान शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या वगळता कोणत्याही दिवशी बँक बंद राहणार नाही.

मुंबई : दोन सप्टेंबरपासून राज्यभरातील बँका सलग आठ दिवस बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मात्र या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी गडबडून जाऊ नये, आणि आपले बँक व्यवहार सुरु ठेवावेत, असं आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ञ्जांनी केलं आहे. 2 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. सोमवारी 3 सप्टेंबरला दहीहंडी असली, तरी मुंबई शहर आणि उपनगरातील फक्त सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत. मात्र बॅंका सुरु राहतील. मंगळवार 4 आणि बुधवार 5 सप्टेंबरला 'रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया'चा संप आहे. मात्र या संपाचा मुंबई शहरातील किंवा राज्यातील कोणत्याही बॅंकांशी संबंध नाही. त्यामुळे आरबीआयचा संप असला तरी बॅंका सुरु राहणार आहेत. गुरुवार 6 आणि शुक्रवार 7 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे बॅंका सुरु राहतील. 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्यामुळे काही बॅंका बंद राहतील, तर 9 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे सर्व बॅंका बंद राहतील. म्हणजेच एक ते आठ सप्टेंबर दरम्यान शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या वगळता कोणत्याही दिवशी बँक बंद राहणार नाही. थोडक्यात, सलग आठ दिवस बँका बंद राहण्याबाबत सोशल मीडियावर वायरल झालेला मेसेज खोटा आहे. तारीख - वार - 2 सप्टेंबर - रविवार - साप्ताहिक सुट्टी 3 सप्टेंबर - सोमवार - दहीहंडी, बँका सुरु 4 सप्टेंबर - मंगळवार - रिझर्व्ह बँकेचा संप, मात्र बँका सुरु 5 सप्टेंबर - बुधवार - रिझर्व्ह बँकेचा संप, मात्र बँका सुरु 6 सप्टेंबर - गुरुवार - बँका सुरु 7 सप्टेंबर - शुक्रवार - बँका सुरु 8 सप्टेंबर - शनिवार - दुसरा शनिवार - साप्ताहिक सुट्टी 9 सप्टेंबर - रविवार - साप्ताहिक सुट्टी
आणखी वाचा























