(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आज संपावर, नोकर भरतीसंबंधी मागण्यासाठी आक्रमक भूमिका
Bank of Maharashtra Strike: एकीकडे कामाचा ताण वाढतोय तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही अशी तक्रार बँक कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे.
मुंबई: नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या आजच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे.राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या 13 हजार इतकी आहे. दरम्यान 30 आणि 31 जानेवारी रोजी देशातील सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
युनायटेड फोरम ऑफ महा बॅंक युनियनकडून एक परिपत्रक काढत देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. देशातील सर्व बॅंकांकडून 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक अयशस्वी ठरल्यास बॅंक ऑफ महाराष्ट्र 27 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.
संपावर जाण्याचं कारण काय?
सध्याची असलेली कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय, मात्र बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याचा आरोप बॅंक संघटनेकडून करण्यात येतोय. दुसरीकडे, बॅंकेचा कारभार 250 पटीनं वाढला आहे, सोबतच अनेक शाखा देखील वाढल्या आहेत, तरीही कर्मचारी संख्या मात्र वाढवली जात नाही असा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी करत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राकडून व्याज दरात वाढ
'बँक ऑफ महाराष्ट्र'ने मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ केली आहे. ही व्याज दरवाढ 9 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. बँकेने सात दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज दर वाढवले आहेत. ग्राहकांना 400 दिवसांच्या मुदत ठेव योजना असलेली 'महा धनवर्षा' योजनेत 6.30 टक्के व्याज मिळतो.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 7 ते 30 दिवसांच्या मुदत ठेवीवर 2.75 टक्के, 31 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3 टक्के, 46 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.50 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. 91 ते 119 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.50 टक्के, 120 ते 180 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.75 टक्के, 181 ते 270 दिवसांसाठी 5.25 टक्के, 271 ते 299 दिवसांसाठी 5.50 टक्के व्याज दर लागू आहे. 300 दिवसांच्या एफडीवर 5.85 टक्के व्याज लागू केला आहे. 301 दिवस ते 364 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 5.50 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. तर, 365 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 6 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. एक वर्ष ते 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6 टक्के, 400 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.30 टक्के व्याज दर मिळत आहे. तर, तीन ते पाच वर्षांसाठीच्या मुदत ठेवीसाठी 5.75 टक्के आणि पाच वर्षांहून अधिक काळाच्या मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे.