(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Headlines 23 January: बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार; जाणून घ्या आज दिवसभरातील घडामोडी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून त्या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. तसेच आज दुपारी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणाही करण्यात येणार आहे. आज उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, विधान भवनात तैलचित्राचे अनावरण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्या निमित्ताने त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी ठाकरे आणि शिंदे गटातील नेते दिवसभरात येऊन अभिवादन करताना पाहायला मिळतील. आज विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. चित्रकार चंद्रकला कदम यांनी हे तैलचित्र साकारलं आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधानभवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार निर्णय घेतल्याचं नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केलं होतं.
शासकीय आमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे निमंत्रित आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच आमंत्रित केललं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र व्यासपीठावर नेमकं कोण कोण असणार हे अद्याप कळालेलं नाही.
शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा
शिवसेनेतील ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. आपली युती ही शिवसेनेसोबत असेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात नंतर पाहून घेऊ अशी भूमिका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस
आज उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपुष्टात येत आहे. यामुळे 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेला आहे. मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत उद्धव यांच्याकडे 5 वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. ही मुदत 23 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होत आहे. एकीकडे मुदत पुर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आजपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
राज ठाकरेंच्या आयुष्यावर नाटक
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर नाटक येतंय. 'बाळासाहेबांचा राज' या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ आज मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात दुपारी 4.30 वाजता होणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं या नाटकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या विशेष सहकार्याने हे नाटक सादर केलं जाणार आहे .
राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय बाल पुरस्कार, बीडच्या रोहन बहिरचा समावेश
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान मोदी 24 जानेवारीला या पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधतील. बीडच्या राजुरी येथील 15 वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप असून राजुरी येथील नदीत वाहून जाणाऱ्या एका महिलेचे प्राण रोहनने वाचवले होते. रोहनने दाखवलेल्या धाडसाबद्दल एबीपी माझाने देखील त्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
'आयएनएस वागीर' नौदलात दाखल
सायलेंट किलर म्हणून ओळख प्राप्त असेलली प्रोजेक्ट -75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होत आहे. भारतीय बनावटीची माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली 'आयएनएस वागीर' ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांतील 21 बेटांना परमवीर विजेत्यांची नावं
पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांतील 21 सर्वात निनावी बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर बांधण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरणही करतील. मेजर सोमनाथ शर्मा, सूबेदार और मानद कप्तान करम सिंह, एम.एम., सेकंड लेफ्टिनेंट राम राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंह, कंपनी हवलदार मेजर पीरू सिंह, कैप्टन जी.एस. सलारिया, लेफ्टिनेंट कर्नल (तत्कालीन मेजर) धन सिंह थापा, सूबेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद, लेफ्टिनेंट कर्नल अर्देशिर बुर्जोरजी तारापोर, लांस नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सूबेदार बाना सिंह, कप्तान विक्रम बत्रा, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, सूबेदार मेजर (तत्कालीन राइफलमैन) संजय कुमार और सूबेदार मेजर सेवानिवृत्त (मानद कप्तान) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांच्या नावे आता ही बेटं ओळखली जाणार आहेत.