... तर पोलिसांचं डबल अभिनंदन, शर्मिला ठाकरेंनी वाचून दाखवला मेसेज; जखमी पोलिसांची भेट
मला एका मसेज आलाय, मुद्दामून मी काढून ठेवलाय तो वाचायला. एन्काऊंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन, पण जाणूनबुजून एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा (Akshay shinde) एन्काऊंटर करण्यात आल्याने राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एन्काऊंटर (Encounter) म्हणजे खून असल्याचा दाखला देत संबंधित प्रकरणात आणखी कोणाला वाचविण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. त्यातच, याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेंच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे, या घटनेला अतिशय गांभीर्याने घेण्यात आल्याचे दिसून येते. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीहींनी एन्काऊंटरच्या घटनेचं समर्थन करत आनंदोत्सव साजरा केला. तसेच, खासदार नरेश म्हस्के यांनी एन्काऊंटरमध्ये जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आता, मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी जखमी पोलिसांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना एन्काऊंटचे समर्थन केले. तसेच, एक मेसेजही वाचून दाखवला.
मला एका मसेज आलाय, मुद्दामून मी काढून ठेवलाय तो वाचायला. एन्काऊंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन, पण जाणूनबुजून एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन, हा मेसेज शर्मिला ठाकरे यांनी वाचून दाखवला. मी कुठल्याही राजकीय पक्षाची म्हणून किंवा राजकीय नेत्याची, राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नसून एक महिला म्हणून मी बोलत आहे. दिल्लीच्या गुन्ह्यात 6 वर्षांनी फाशी लागते, न्यायालयात खटला लांबला की महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे, आम्हाला महिलांना हाच शक्ती कायदा पाहिजे आहे. शर्मिला ठाकरे यांनी एन्काऊंटर प्रकरणातील जखमी पोलिसाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. तसेच, एन्काऊंटरच्या घटनेचं त्यांनी समर्थन केलंय.
महिलांवर जे अत्याचार होतात ते लोकशाहीला पूरक आहेत, ते लोकशाहीला मारक नाही का, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी विचारला. तसेच, हैदराबादमध्ये पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर आज चूक दाखवणाऱ्या विरोधकांनीच त्यांचे अभिनंदन केलं होतं. हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील पोलिसांना वेगळा न्याय, हे कसं चालेल अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी एन्काऊंटरच्या घटनेचं समर्थन केलंय.
मनसेकडून पोलिसांना 51 हजारांचे बक्षीस
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सदर घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने ओरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. मी याआधी म्हटलं होतं, की आमचं सरकार असतं तर एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.
एन्काऊंटरवर न्यायालयाचा सवाल?
बदलापूर खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (23 सप्टेंबर) रोजी अचानक पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने फौजदारी रिट याचिका दाखल केली. आज या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेने पिस्तुल हिसकवल्याच्या आरोपावर विश्वास ठेवणं कठीण जात असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम