Bachchu Kadu : पंतप्रधान मोदींसोबत मिटिंगमध्ये होतो, पण NDA सोबत असल्याचं गृहीत धरू नये, अद्याप पाठिंबा नाही; बच्चू कडूंची भूमिका
Bachchu Kadu On NDA : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपण मंत्रिपदाच्या दाव्याचा त्याग केल्याचं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.
मुंबई: मंगळवारी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर बच्चू कडूंनी त्यावर स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी एनडीएच्या मिटिंगला हजर होतो, पण त्याचा अर्थ मी एनडीएसोबत आहे असं कुणीही गृहीत धरू नये, त्याला पाठिंबा देण्याच्या अद्याप निर्णय घेतला नाही असं महत्त्वपूर्ण वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपण मंत्रिपदाच्या दाव्याचा त्याग केल्याचंही ते म्हणाले.
मंगळवारी दिल्लीमध्ये भाजप पुरस्कृत एनडीए घटक पक्षांची एक बैठक झाली. त्या बैठकीला राज्यातून बच्चू कडू यांच्यासह शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्या जनसुराज्य पक्षाचा समावेश होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. प्रहारचे आमदार बच्चू कडू या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर ते एनडीएचा घटक झालेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. बच्चू कडूंनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Bachchu Kadu On NDA PM Modi : काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणाले की, मी मिटिंगला हजर होतो याचा अर्थ एनडीएसोबत आहे असे कुणीही गृहीत धरू नये. एनडीएला पाठिंब्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. महाराष्ट्रातील मंत्रिपदाचा दावा मी सोडला आहे. एकनाथ शिंदेंसाठी हा त्याग केला आहे.
एनडीएसोबत आहोत असं लोक गृहीत धरू शकतात. मात्र आम्ही कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय पुढील राजकीय रणनीती जाहीर करू शकत नाही. आमचा पक्ष छोटा आहे, चुकीचा निर्णय होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पुढील दहा दिवसांमध्ये एनडीए संदर्भात आमचा अंतिम निर्णय होईल.
सरकार आणि निवडणूक यात फरक असतो.आजवर मी कधीही कुणाचा पाठिंबा घेतला नाही. कुणाला पाठिंबा दिला नाही. मी स्वतंत्र लढलेलो आहे. सरकारमध्ये सहभागी होताना, आम्ही आमच्या मतदारसंघाच्या सोयीने सहभागी झालो. भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी आम्हाला गृहीत धरावे किंवा धरू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही काय पाऊल पुढे टाकावं तो आमचा निर्णय आहे.
एकनाथ शिंदेंसाठी मंत्रिपदाचा दावा मागे
मी मंत्रीपदासाठी आग्रही होतो, मात्र राजकीय परिस्थितीनुसार मी मंत्रीपदाचा माझा दावा मागे घेतला आहे. माझीही मंत्री बनण्याची इच्छा होती. मात्र राजकीय परिस्थिती बदलली आणि एकनाथ शिंदेंसाठी मी माझा मंत्रीपदाचा दावा मागे घेतला आहे. एकनाथ शिंदेंच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेत माझा मंत्रिपदाचा दावा सोडला आहे.
ही बातमी वाचा: