Bacchu Kadu : अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं लक्ष, मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर
आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत आज प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत.
Bacchu Kadu : अमरावतीत (Amravati) आज (1 नोव्हेंबर) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू आज त्यांची भुमिका मांडणार आहेत. कडू नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' चे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवी राणा यांनी याबबात दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं. तसेच बच्चू कडू यांनी त्यांच्याबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आज बच्चू कडू नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला आमदार रवी राणा गेले होते. परंतू बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली नव्हती.
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामधील नेमका वाद काय?
ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदारसंघातील एका कार्यक्रमात आमदार रवी राण यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात एक वक्तव्य केलं होतं. 'मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या' है या मतदारसंघातल्या आमदाराचं 'स्लोगन' आहे, अशी टीका त्यांनी केली होती. बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप रवी राणांनी केला होता. त्याशिवाय हा 'तोडपाणी' करणारा आमदार असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी रवी राणांविषयी अपशब्दांचा वापर केला आणि त्यानंतर हा वाद चांगलाच वाढत गेला.
बच्चू कडूंनी रवी राणांना एक नोव्हेंबरचा दिला होता अल्टीमेटम
रवी राणांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. रवी राणांना या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. याबाबत रवी राणांना एक नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला होता. तो अल्टीमेटम आज संपत आहे. अद्याप रवी राणांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यानंतर आज बच्चू कडू त्यांची भूमिका मांडणार आहेत. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीत तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis On Bachchu Kadu: बच्चू कडू माझ्या फोननंतर गुवाहाटीला गेले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले