(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad water issue : महानगरपालिका आहे की ग्रामपंचायत? औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाजले बारा
Aurangabad water issue : आता पाचव्या दिवशी येणारे पाणी शहरवासीयांना सातव्या आठव्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे.
Aurangabad water issue : भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा (Water Issue) सामना करणाऱ्या औरंगाबादच्या (Aurangabad) शहरवासियांना आता भर पावसाळ्यात देखील पाणी वेळेवर मिळत नाही. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सतत कोणत्या-कोणत्या कारणांनी बंद पडत आहे. कधी ट्रान्स्फॉर्मर जळतो, कधी पंपहाऊसमध्ये शॉर्टसर्किट होते, तर कधी जलवाहिनी फुटते. त्यामुळे दुरुस्तीसाठी जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा बंद केला जातो आणि यामुळे वेळापत्रक पुढे ढकलेले जाते. आता पुन्हा एकदा असच प्रकार समोर आला असून, जायकवाडी (Jayakwadi) येथील पंपहाऊसमध्ये देखभाल-दुरुस्तीचे काम करताना दोन ट्रान्स्फॉर्मर जळाले आहे. त्यामुळे आता पाचव्या दिवशी येणारे पाणी शहरवासीयांना सातव्या आठव्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जायकवाडी येथील पंपहाउसमधील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी शटडाऊन घेतला होता. देखभाल-दुरुस्तीचे रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होते. दरम्यान, काम संपल्यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, त्याच वेळी पंपहाउससाठीचा ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे. मग काय पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यासाठी फारोळा जलशुध्दीकरणाच्या पंपहाउसमध्ये ठेवण्यात आलेला अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर जायकवाडीला नेण्यात आला.
फारोळा येथून नेलेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जोडणीचे काम शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होते. जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पण, सुरुवातीला थोडा वेळ ट्रान्स्फॉर्मर चालला, मात्र नंतर तो बर्स्ट झाला. विशेष म्हणजे, सर्व पंप सुरू असताना शहरात 110 ते 120 एमएलडी पाणी येते असताना, शनिवारी तीन पंपावरून फक्त 60-70 एमएलडी पाणीच शहरात येत होते. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
महानगरपालिका आहे की ग्रामपंचायत?
कोट्यावधी रुपये खर्च करून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना कालबाह्य झाल्या आहेत. पण, असे असतांना जोडाजाडी करत कसेतरी या योजना चालवल्या जात आहे. त्यातच, योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा योजना सतत खंडीत होत आहे. काय तर म्हणे जायकवाडी येथील पंपहाऊसच्या फिडर धामण जाऊन बसली आणि शॉर्टसर्किट होऊन पाणीपुरवठा बंद पडला. एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजन देखील संबंधित यंत्रणेकडून होत नाही. त्यामुळे ही महानगरपालिका आहे की ग्रामपंचायत असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच आणखी किती दिवस औरंगाबादकरांना पाणी प्रश्न सोसावा लागणार आहे? असा सवाल सर्वसामन्य विचारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
काय सांगता! धामणीने बंद पाडला अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा; विघ्न संपता संपेना