काय सांगता! धामणीने बंद पाडला अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा; विघ्न संपता संपेना
Aurangabad News : शनिवारी जायकवाडी येथील पंपहाऊसच्या फिडर क्रमांक चारमध्ये व्हॅक्युम कनेक्टरवर दुपारी धामण जाऊन बसली आणि शॉर्टसर्किट झालं.
Aurangabad News : भर उन्हाळ्यात औरंगाबादकरांना (Aurangabad) पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे मागील काही महिन्यात सतत पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या योजनेत अडथळे येत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. मात्र, आता भर पावसाळ्यात (Rain) देखील काही वेगळी परिस्थिती नसल्याचे चित्र आहे. कारण पुन्हा एकदा जायकवाडी (Jayakwadi) येथील पंपहाऊसचं फिडर बंद पडल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पंपहाऊसच्या फिडरमध्ये धामण जाऊन बसल्याने शॉर्टसर्किट झालं. त्यामुळे पंपहाऊस (Pump House) बंद पडलं आणि पाणी उपसा पूर्णपणे थांबला. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
शनिवारी जायकवाडी येथील पंपहाऊसच्या फिडर क्रमांक चारमध्ये व्हॅक्युम कनेक्टरवर दुपारी धामण जाऊन बसली. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन पंपिंग बंद पडले. यामुळे औरंगाबाद शहराला 700 आणि 1400 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना बंद पडल्या. दरम्यान याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. दुपारी चार वाजेच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टप्प्या टप्प्याने दोन्हीही योजनेचा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होत्या.
विघ्न संपायला तयार नाहीत...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांमधील विघ्न संपायला काही तयार नाही. एकीकडे धामणीमुळे पंपहाऊसचे फिडर बंद पडले, तर दुसरीकडे शहरातील क्रांती चौक येथील जलकुंभाला आणि या जलकुंभातून जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी सातशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी शनिवारी सकाळी रेल्वेस्टेशन जवळ फुटली. त्यामुळे जलवाहिनीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. दरम्यान जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी चार वाजता हे काम संपल्यावर जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र यामुळे खोकडपुरा, अजबनगर, गांधीनगर, पैठणगेट, गुलमंडी आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
एक दिवस उशिराने पाणीपुरवठा
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांमध्ये अडथळे आल्याने चार ते पाच तास शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे जायकवाडीहून शहरात पाणी येऊ शकले नाही आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अशा सर्व परिस्थितीत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले आहे. शहराच्या काही भागांत विलंबाने तर काही भागात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचं सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: