'हे बिहारचं औरंगाबाद तर नाही ना!'; आता भरदिवसा सराफा व्यापाऱ्याला लुटलं, चाकूच्या धाकावर 12 लाखाचे दागिने लांबवले
Aurangabad Crime News : विशेष म्हणजे सराफा दुकान लुटल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी आता कळस गाठलं आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याची चर्चा आहे. त्यात आता गुन्हेगारांची एवढी हिंमत वाढली आहे की, भरदिवसा लुटमारीची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहर पोलिसांच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका सराफा व्यावसायिकास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले आहे. आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास रांजणगावात हा सर्व प्रकार समोर आला आहे. ज्यात व्यापाऱ्याच्या हातावर चाकूने वार करत अंदाजे 12 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे. विशेष म्हणजे सराफा दुकान लुटल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुकुंद उत्तमराव बेदरे (वय 50 वर्षे, रा.सिडको वाळूजमहानगर) असे सराफा दुकानदाराचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
वाळूज भागातील रांजणगावात काही सराफा व्यापाऱ्यांचे दुकाने आहेत. तर, मुकुंद उत्तमराव बेदरे यांची देखील याच भागात सराफा दुकान आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे त्यांनी आज दुकान उघडली होती. मात्र, साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या दुकानात एकाने प्रवेश केला. काही कळण्याच्या आताच दुकानात आलेल्या चोराने काऊंटवरुन उडी मारत बेदरे यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करायला सुरवात केली. यावेळी दोघांमध्ये झटापट सुरु असतानाच आणखी दोघेजण दुकानात आले. त्यांनी आतमधून शटर लावून घेतले. याचवेळी एकाने बेदरे यांच्या हातावर थेट चाकूचा वार केला. त्यामुळे बेदरे घाबरले आणि जिवाच्या भितीने त्यांनी माघार घेत शांत बसले. तर दुकानात आलेल्या तिघांपैकी दोघांनी रॅकमधील दागिने बँगामध्ये भरले. त्यानंतर ते तेथून पसार झाले. यात त्यांनी अंदाजे 12 लाखाचे दागिने पळवले असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेचे पथक देखील पोहचले. तर ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
शहरात गुन्हेगारी वाढली?
मागील काही दिवसांत औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कधी गोळीबार, कधी खुनाची घटना, तर लुटमार, त्यात दुचाकी चोरीच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यात आता भरदिवसा लुटमारीची देखील घटना समोर आल्याने 'हे बिहारचं औरंगाबाद तर नाही ना' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad Crime News : दहा रुपयाच्या वादावरून हत्या; खून केल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर