(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad Crime News : चार चौघात उसनवारीचे पैसे मागत असल्याने तरुणाचा केला खून, तिघांना पोलिसांकडून अटक
Aurangabad Crime News : म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाच्या पाईपमध्ये एक मृतदेह साडी व प्लास्टीकच्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेल्या अवस्थेत आढळून होता.
Aurangabad Crime News : उसणे दिलेले पैसे चार चौघात मागितल्याच्या राग आल्याने एका तरूणाचा खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) उघडकीस आली आहे. तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृत तरुण बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली होती. दरम्यान कन्नड तालुक्यातील औराळा येथील पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (Crime News) तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. सागर संतोष जैस्वाल (21) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पुलाच्या पाईपमध्ये आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबरपासून सागर जैस्वाल बेपत्ता होता. त्याच्या नातलगांनी त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला होता. मात्र, त्यात यश न आल्याने सागरचे काका विनोद धनुलाल जैस्वाल (वय 38वर्षे, व्यवसाय हॉटेल चालक रा. औराळा ता. कन्नड) यांनी सागर बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती. तक्रार दाखल होताच देवगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी तपास कामाला लागले होते. दरम्यान, 1 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पेडकवाडी शिवारातील पेडकवाडी घाटात म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाच्या पाईपमध्ये एक मृतदेह साडी व प्लास्टीकच्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेल्या अवस्थेत आढळून होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अधिक चौकशी केली असता, हा मृतदेह हा सागर संतोष जैस्वाल यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
तिघांना घेतलं ताब्यात...
सागरला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह साडी व प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून घाटातील पाईपमध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. त्यात तिघांनी हा गुन्हा पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून केल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी पंढरीनाथ परसराम वाघचौरे (वय 28 वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड), काकासाहेब परसराम वाघचौरे ( वय 34 वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा,कन्नड), दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके (वय 22 वर्षे, रा. कविटखेडा ता. कन्नड) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनीच खून केल्याची कबुली दिली.
चार चौघात मागायचा पैसे...
मयत सागर जैस्वाल याच्याकडून पंढरीनाथ वाघचौरे आणि दिनेश उर्फ पप्पु साळुंके यांनी उसने पैसे घेतलेले होते. मृत सागर जैस्वाल हा नेहमी त्यांच्याकडे चार चौघात उसनवारीने घेतलेल्या पैशांची मागणी करुन त्यांचा अपमान करीत होता. त्यामुळे त्यांनी सागर जैस्वाल यास पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात बोलाविले होते. तेथे त्यांनी त्याचा लोखंडी हातोडी व दगडाने डोक्यात मारुन त्याला कायमचं संपवलं. त्यानंतर प्रेत पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये टाकून दिले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठया व कानातील बाळी काढून घेतली. अशी कबुली तिन्ही आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
प्रेम प्रकरणात अडसर; पतीचा जेवणातून रोज थोडं थोडं विष देऊन काढला काटा; दोघांना अटक