शक्तीपीठ महामार्गला विरोध, लातुरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र, राजू शेट्टींनी स्वीकारलं फडणवीसांचं आव्हान
शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी आद लातुरमध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आले होते. यावेळी राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti : गेल्या महिन्यात शक्तीपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) विरोधात मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात शेतकऱ्यांनी (Farmers) आंदोलन केले होते. या आंदोलनाविषयी बोलताना विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात जेवढे लोक आले त्यापेक्षा तिप्पट शक्तीपीठ महामार्ग पाहिजे, असे म्हणायला लोक येतील असे वक्तव्य केले होते. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. फक्त येताना सोबत सातबारा घेऊन यावे, असे म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रति आव्हान दिले आहे.
कायदा हातात घेऊन शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील
मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने लातुरात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. या परिषदेस राज्यातील बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, असे ते म्हणाले. कायदा हातात घेऊन शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतील. त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करायला यावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी दिले. तसेच शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही शेतकऱ्यांचे समर्थन नाही. हा महामार्ग व्हायला पाहिजे यासाठी जो आटापिटा चाललाय त्याच्या पाठीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताच शक्तिपीठबाबत धोरण बदललं असून कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा 12 जिल्ह्यातून विरोध असतानाही शक्तीपीठ रेटला जात असताना शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णय निसर्ग उध्वस्त करणारा
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णय निसर्ग उध्वस्त करणारा आहे. माणसे देशोधडीला लावणारा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा अशी मागणी असताना ती पूर्ण होत नाही, मग महामार्ग बनवायचा कशाला? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. राज्याकडे सध्या पैसा नाही, अशावेळी हा प्रकल्प राबवण्यासाठी अट्टाहास का आहे? असा सवालही बाधित शेतकरी करत आहेत. यावेळी काही ठराव घेण्यात आले आहेत. या विषयातील अभ्यासू व्यक्ती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित चर्चा करुनच मार्ग काढावा बाकीचे पर्याय आम्हाला नको असे काही ठराव करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























