(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangali : इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटलच्या पाच जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा; निषेधार्थ डॉक्टर, स्टाफचं आज कामबंद आंदोलन
सांगलीतील इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटलवर जादा पैसे मागून मृतदेह देण्यास नकार दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश हॉस्पिटलच्या 5 जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे सर्व गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि स्टाफकडून आज कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
सांगली : इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटलच्या डॉक्टर, स्टाफ मधील 5 जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका मंत्र्याच्या दबावापोटी हॉस्पिटलला बदनाम केले जात असल्याचा आरोप हॉस्पिटल संस्थापकाकडून करण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ प्रकाश हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, स्टाफ यांनी आज कामबंद आंदोनलनाचा निर्णय घेतला आहे. तर हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांना प्रशासनाने दुसरीकडे शिफ्ट करावं अन्यथा डॉक्टर आणि अन्य स्टाफवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटलवर जादा पैसे मागून मृतदेह देण्यास नकार दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश हॉस्पिटलच्या 5 जणांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदू नामदेव कांबळे या व्यक्तीनं याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ज्यादा पैसे घेऊन आणखी दोन लाख 17 हजार रुपयांची मागणी केली तसेच मृतदेहाची विटंबना केल्याचा आरोप या हॉस्पिटलवर करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश हॉस्पिटलमधील 5 जणांवर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हॉस्पिटलचे संस्थापक निशिकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळत महामारीच्या परिस्थितीत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असून एका मंत्र्याच्या दबावापोटी हे सर्व होत आहे. तसेच यातून प्रामुख्याने हॉस्पिटलचे नाव बदनाम केले जात असल्यचा आरोप निशिकांत पाटील यांनी केला आहे.
हे सर्व गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ इस्लामपूरमधील कोरोना रुग्ण असलेल्या प्रकाश हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर आणि स्टाफ आज 11 वाजता कामबंद आंदोलन करणार आहेत. सध्या हॉस्पिटलमध्ये 100च्या आसपास कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने आजपासून नवीन कोणताही रुग्ण दाखल न करून घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रशासनाने इतरत्र सोय करावी असे पत्र हॉस्पिटलकडून जिल्हाधिकारी यांना दिले गेले आहे. प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची जबाबदारी घेत प्रशासनाने त्या रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करावं अन्यथा डॉक्टर आणि अन्य स्टाफवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत, अशी मागणी पत्राद्वारे हॉस्पिटलने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :