संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी, तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित
सोलापूरमधील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवसेवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे.
सोलापूर : संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशाची मागणी केल्याप्रकरणी सोलापुरातील एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकीत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सोलापूरतल्या अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने देखील बंद करून घरात बसावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण सोलापूरमध्ये बंद पाळण्यात आला. परंतु विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. ही घटना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यापर्यत पोहोचली. त्यावरून पोलीस आयुक्तांनी त्याबाबत चौकशी केली आणि तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांना नियंत्रण कक्षात बसवल्याची माहिती मिळते आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 हून अधिक गुन्हे दाखल,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 300 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये जवळपास 864 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर संचारबंदी लागू असताना कोणत्याही कारणाविना फिरणाऱ्या लोकांचे थेट वाहनच पोलिसांनी जप्त केले आहे. जवळपास 43 वाहने आतापर्यंत सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जप्त केली आहेत. 23 मार्चपासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 511 तर मोटार व्हेईकल ऍक्टनुसार 4471 वाहनचालकांवर सोलापूर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यभरात संचारबंदी लागू असल्याने लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. दरम्यान दुचाकी वाहनावर अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडताना लोकांनी एका गाडीवर एकट्यानेच बाहेर पडावे, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या
- Corona Update | राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू
- Corona | ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टी पाळा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!
- Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा
- India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड