(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sant Nivruttinath Palkhi : 'नाथांच्या जयजयकारे गेले रिंगण रंगुनी', सिन्नरच्या दातलीत रंगला पहिल्या रिंगणाचा अनुपम सोहळा
Sant Nivruttinath Palkhi : संत निवृत्तीनाथांच्या (Ashadhi Ekadashi) पालखीचा 'आनंदाची अनुभूती देणारा, डोळे दिपवणारा नयनरम्य गोल रिंगण सोहळा दातलीत पार पडला.
Sant Nivruttinath Palkhi : 'या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनि संत सदनी राहिला...' आनंदाची अनुभूती देणारा, डोळे दिपवणारा नयनरम्य गोल रिंगण सोहळा दातलीत (Datli) पार पडला. माऊलींच्या दोन अश्वांचा हा रिंगण सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी सिन्नरकरांसह (sinnar) वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. हजारो वारकऱ्यांनी हा रिंगण सोहळा लक्ष लक्ष नेत्रांनी साठवून घेतला. यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी मुक्कामी खंबाळेकडे मार्गस्थ झाली.
संत निवृत्तीनाथांच्या पालखी (Sant Nivruttinath Palkhi) आज दातलीत पोहचली. त्यानंतर ध्वज करी, विणेकरी, तालवादक आणि तुळशी महिलांचे रिंगण पार पडल्यावर शेवटी माऊलींच्या आश्वाचा रिंगण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सर्वत्र 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय' हा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. तत्पूर्वी सिन्नर (Sinnar) तालुक्यातील लोणारवाडी येथील मुक्काम आटोपल्यावर पालखीचे प्रस्थान सिन्नर नगरीतून पुढे जात कुंदेवाडी, मुसळगाव आणि नंतर दातली गावी रिंगण स्थळाकडे मार्गस्थ झाले सकाळपासूनच मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सुरू होता. सकाळी कुंदेवाडी येथे आमरस आणि पुरणपोळीचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी दिंडी दातलीकडे रवाना झाली होती.
सकाळपासूनच वारकऱ्यांची रेलचेल असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पायी दिंडी पालखी सोहळा दातलीत पोहोचला. यानंतर अश्वांची पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांनी दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. स्वारीचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ मानाचा अश्वही धावला. यावेळी लाखो भाविकांनी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' नामाचा एकच जयघोष केला. या जयकारात नेत्र दीपक दौड करीत हा रिंगण सोहळा आठवणीत साठवून ठेवला.
असा पार पडला रिंगण सोहळा
मानाचे अश्व दुपारी चार वाजता हजारो वारकऱ्यांसह दातली नगरीत पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखी दिंडीचे स्वागत केले. बरोबरच नाथांचा रथही पोहोचला. यावेळी हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने विधिवत पूजा करण्यात आली. दातली येथील लक्ष्मण रामभाऊ शेळके व कैलास रामभाऊ शेळके यांच्या मालकीच्या साडेतीन एकर क्षेत्रावर अखीव रोखी रेखीव गोल रिंगणासाठी मैदान सुशोभित करण्यात आले होते. रिंगणाच्या मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. तर अश्वांचा रिंगणाच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. निवृत्तीनाथांची पादुका व मुकट असलेली पालखी खांद्यावर घेऊन रिंगणात आणण्यात आली. यानंतर देव रिंगण, टाळकरी रिंगण आणि विणेकरी रिंगण पार पडले
आज खंबाळे येथे मुक्काम
त्र्यंबकेश्वरहून (Trimbakeshwer) पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचा आजचा सहावा दिवस असून सिन्नर तालुक्यातील दातली गावी शिस्तबद्ध आणि नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडला. . निवृत्तीनाथ पालखीतील हे पहिलेच रिंगण असून हा सोहळा बघण्यासाठी भाविक आणि गावकरीही हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. सर्व वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, मृदुगवादक गोलाकार उभे राहतात. माऊली माऊली म्हणत हरिनामाचा गजर सुरू होतो. टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. आज संत निवृत्तीनाथ पालखी खंबाळे येथे मुक्कामी असणार आहे.