(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari : आषाढी वारीनिमित्त यंदा चार ठिकाणी महाआरोग्य शिबीर होणार, गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त उपचार होण्याची शक्यता
Ashadhi Wari Health News : गेल्यावर्षी अतिशय नाजूक तब्येत असणाऱ्या दीड हजार पेक्षा जास्त भाविकांना वेळेवर म्हणजे गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवता आले होते.
सोलापूर : यंदाच्या आषाढी सोहळ्यात भाविकाच्या आरोग्यासाठी चार ठिकाणी होणार महाआरोग्य शिबिराचं (Maha Arogya Shibir) आयोजन करण्यात आलं आहे. पालखी सोहळे निघाल्यापासून यात्रा संपेपर्यंत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सांगितलं.
आषाढी सोहळ्यात गेल्यावर्षी महायुती सरकारने लाखो भाविकांसाठी 3 ठिकाणी महाआरोग्य शिबीर घेत विक्रमी साडेअकरा लाख भाविकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम सुरु केला होता. गेल्यावर्षी भाविकांच्या उदंड प्रतिसादानंतर यंदाच्या आषाढी काळात तीन ऐवजी यंदा चार ठिकाणी हे महाआरोग्य शिबिरे भरविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीच्या दीडपट भाविकांना आरोग्याची मोफत सेवा देण्याचा संकल्प केल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माझाशी बोलताना सांगितले.
यावर्षी गेल्या आषाढीचा आमचाच विक्रम आम्ही मोडणार असून पालखी सोहळे निघाल्यापासून आषाढी संपेपर्यंत लाखो भाविकांना सर्वप्रकारच्या मोफत तपासण्या आणि उपचार केले जाणार असल्याचे डॉ तानाजी सावंत यांनी सांगितले.
वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी महाआरोग्य शिबीर
यावर्षी वाखरी येथील पालखी तळ येथे पहिले तीन दिवस महारोग्य शिबीर सुरु होणार असून वाखरी येथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे दोन्ही पालखी सोहळे मुक्कामाला असतात. याठिकाणी पंढरीत जाण्यापूर्वी 250 किलोमीटर अंतर चालून थकलेल्या भाविकाला या महाआरोग्य शिबीरात सर्व प्रकारचे उपचार दिले जाणार आहेत.
यानंतर दुसरे महाआरोग्य शिबीर हे गोपाळपूर येथील दर्शन रांगेत असणार आहे तर तिसरे महाआरोग्य शिबीर हे सोलापूर तीन रास्ता येथे घेतले जाणार आहे . यंदा प्रथमच चौथे महाआरोग्य शिबीर हे 65 एकर येथील भाविकांच्या निवासासाठी उभारलेला जागेत असणार असून येथे जवळपास अडीच ते तीन लाख भाविक निवासासाठी असतात. या भाविकांना दर्शन घेऊन आल्यावर बाहेर जाऊन तपासणी करणे त्रासदायक ठरत असल्याने याच ठिकाणी हे चौथे महाआरोग्य शिबीर असणार असल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले .
याशिवाय गेल्यावर्षी अतिशय नाजूक तब्येत असणाऱ्या दीड हजार पेक्षा जास्त भाविकांना वेळेवर म्हणजे गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवता आले होते. त्याच पद्धतीने यंदा अगदी मंदिरात आणि नामदेव पायरी येथेही अत्यावश्यक उपचाराची व्यवस्था केल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले.
आषाढीच्या काळात तुफानी गर्दी असल्याने अत्यावश्यक सेवा देण्यासाठी याहीवेळी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्ग येथे दुचाकीवरून येऊन उपचार करणाऱ्या ऍम्ब्युलन्स ची व्यवस्था देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले . या आषाढी यात्रा काळात राज्य सरकार कडून केवळ औषध व डॉक्टरांची मदत घेत असून इतर 80 टक्के खर्च प्रा. शिवाजी सावंत अध्यक्ष असणाऱ्या भैरवनाथ शुगरच्या सीएसआर फंडातून करण्यात येत असल्याचा खुलासाही आरोग्यमंत्र्यांनी केला .
अनेक सामाजिक संस्था भाविकांसाठी हजारोंच्या संख्येने चष्मे आणि इतर मदत देत असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या मदतीला सामाजिक काम करणाऱ्या संस्था पुढे येत असल्याने एवढा मोठा खर्च करून लाखो भाविकांना आरोग्याची सेवा पुरवणे शक्य होत असल्याचे डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले . गेल्यावर्षी साडे अकरा लाख भाविकांना या महारोग्यशिबिरातून मोफत आरोग्यसेवा दिली होती . यावर्षी त्याच्या किमान दीडपट जास्त भाविकांना ही मोफत आरोग्यसेवा पुरवण्याचा प्रयत्न असून आम्हीच आमचे रेकॉर्ड मोडणार असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ही बातमी वाचा :