परदेशी पाहुण्यांचे मालवणात आगमन; 'रोझी स्टर्लिंग'चे स्थानिकांसह पर्यटकांना आकर्षण
‘रोझी स्टर्लिंग’ असे या पक्ष्याचे नाव असून मराठीत पळस मैना या नावाने ओळखलं जात. कोकणात ज्या वेळेस पळस फुलायला लागतो त्या वेळेस हे पक्षी कोकणात येतात म्हणून यांना पळस मैना म्हणतात. मैनेसारखा दिसणारा हा गुलाबी पक्षी आहे.
सिंधुदुर्ग : युरोप, मध्य आशिया, तुर्कस्तान भागातून हजारो किलोमीटरचे अंतर कापून कोकणात हजारोच्या संख्येने पक्षी आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पक्षाचे थवेच्या थवे दिसून येत आहे. ‘रोझी स्टर्लिंग’ असे या पक्ष्याचे नाव असून मराठीत पळस मैना या नावाने ओळखलं जात. कोकणात ज्या वेळेस पळस फुलायला लागतो त्या वेळेस हे पक्षी कोकणात येतात म्हणून यांना पळस मैना म्हणतात. मैनेसारखा दिसणारा हा गुलाबी पक्षी आहे. सिंधुदुर्गातील मालवण रेवतळे भागात हे पक्षी विजेच्या तारांवर हजारोच्या संख्येने बसलेले असतात. याचं रेवतळे भागात बाजूलाच कांदळवन असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला असतात. कीटक, फळे, फुलांमधील मध हे या पक्षांचं आवडते खाद्य आहे. त्यांच्या येण्याची व पळस फुले बहरण्याची वेळ एकच असल्याने या पक्ष्याला ‘पळस मैना’ही म्हणतात.
पळसमैना पक्षी झुंडीने असतात. एका टीममध्ये 100 ते 1000 संख्येत हे पक्षी असतात. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोझी स्टर्लिंग पक्ष्याचे डोके व मान काळीभोर असते. गळा व पोट चमकदार गुलाबी असून पाठीवर पांढरी-गुलाबी झालर असते व डोक्यावर मध्यभागी आकर्षक तुरा, चोच तीक्ष्ण असून पंख काळे-तपकिरी, किंचित निळे-हिरवट असतात. नर व मादी सारखेच असून मादीचा तुरा थोडा आखूड असतो. हे पक्षी पिकांवरील अळ्या व कीटकांचे आक्रमकरीत्या भक्षण करत असल्याने यांच्या आगमन काळात कीटकांची संख्या कमी होते. त्यामुळेच यांना "नैसर्गिक कीटकनाशक' म्हणतात तर यांच्या विष्ठेतून जमीन सुपीक होत असल्याने यांना "शेतकरी मित्र' असेही म्हटलं जात. यांच्या विष्ठेतून मोठमोठे वृक्ष उगवतात. वनस्पतींची पुनर्निर्मिती होऊन परागकणांची देवाण-घेवाण होते. हे पक्षी फुलांतील मध खातात म्हणून दक्षिण भारतात यांना "मधुसारिका' असे म्हटलं जात.
या पक्ष्यांचे समूह पश्चिमी जगतातून व मध्य आशियातून रोमानिया, युक्रेन, कझाकिस्तान, तुर्किस्तान, ग्रीस, उजबेकिस्तान, इराण, अफगाणिस्तान, मंगोलिया, पाकिस्तान, चीन, नेपाळ या मार्गे हजारो मैल अंतर कापून ते भारतात येतात. यांचे समूहनृत्य विहंगम असते. फुलझाडांकडे आकर्षित होणाऱ्या रोझी स्टर्लिंग हे पक्षी सध्या मालवणात स्थिरावले आहेत. रेडी रेवस या सागरी महामार्गा लगत असलेल्या विजेच्या तारांवर दररोज सकाळ, संध्याकाळी हजारो पक्ष्यांची शाळा भरते. रोझी स्टर्लिंग या परदेशी पाहुण्यांनी आकाशात झेप घेऊन आकर्षक कलाकृती करत असतात. निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे.
या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे झाडावर आसनस्थ होण्यापूर्वी हजारांच्या संख्येत ठरलेल्या वेळेतच एकत्र येऊन हवाई कसरत करतात. हे विलोभनीय दृश्य सर्वांना थक्क करून सोडते. सुमारे पंधरा मिनिटांच्या कसरतीनंतर झाडावर विसावून दहा मिनिटे एकच कलकलाट करीत. आपसात संवाद साधतात. अंधार दाटून आला की एकदम चिडीचूप होऊन झोपी जातात. सूर्योदयाबरोबर हे पुन्हा सुमारे दहा-बारा मिनिटे हवेत घोंगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नंतर सर्व दिशेने विखरून जातात.