Armed robbery at State Bank: 'धुम' स्टाईलने स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत डांबलं, 1 कोटी रक्कम तब्बल 12-13 किलो सोनं लुटलं
अंदाजे 1 कोटी रोख रक्कम आणि 12-13 किलो सोने चोरीला गेल्याची माहिती आहे. या चोरीमुळे संपूर्ण कर्नाटक जिल्हा हादरून गेला आहे. एखद्या सिनेमाला शोभेल असा हा दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रम होता.

Armed robbery at State Bank: कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचणमध्ये काल (16 सप्टेंबर) स्टेट बँक ऑफ इंडियावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात बँकेच्या लॉकरमधील कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोकड लंपास झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नसल्याने अद्याप किती सोने आणि किती रोकड चोरी झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अंदाजे 1 कोटी रोख रक्कम आणि 12-13 किलो सोने चोरीला गेल्याची माहिती आहे. या चोरीमुळे संपूर्ण कर्नाटक जिल्हा हादरून गेला आहे. एखद्या सिनेमाला शोभेल असा हा दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रम होता.
कामकाज संपताच बँकेत दरोडा
सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास तीन दरोडेखोर हे चारचाकी कारमधून चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ आले. तर दोघे दरोडेखोर हे दुचाकीवरून आले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास यातील एक दरोडेखोर हा बँकेत येऊन बसला होता. बाहेर असलेल्या दरोडेखोरांना बँकेतील घडामोडी सांगत होता. बँकेची कामकाजाची वेळ संपल्याने ग्राहक बाहेर गेल्यानंतर बँकेच्या आत असलेल्या दरोडेखोराने त्याच्या इतर साथीदारांना आत बोलावून घेतले. मग बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून बांधून ठेवलं. संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत सुमारे एक तास या दरोडेखोरांनी बँकेतील सोने, कागदपत्रे, रोकडं असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
भरधाव निघालेली गाडी लोकवस्तीत घुसली
सूत्रांच्या माहितीनुसार हे सर्व चोर चोरी केल्यानंतर एका ठिकाणी थांबले. त्यानी चोरीतून मिळालेले माल आपपसात वाटून घेतलं. आणि सर्वजण वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. यातील एक चोरटा हा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीच्या दिशेने येतं होता. त्या गाडीची धडक गावातील एका व्यक्तीला बसली. त्यावेळी गावातील नागरिकांनी गाडीचा पाठलाग केला. लोकांच्या भीतीने भरधाव निघालेली गाडी लोकवस्तीत घुसली. पुढे कुठे जायचा याचा अंदाज न आल्याने चोरट्याने हातात पैशांची बॅग उचलली. लोकांना बंदूक दाखवत तो गाडीतून बाहेर पडला. मुसळधार पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत तो तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
मात्र त्यावेळी लोकांना लक्षात आलं की जो बॅग चोरटा घेऊन जातं होता त्यातून पैसे पडलेत. ग्रामस्थांनी हे पाहताच तत्काळ पोलिसांना कळवलं. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस, कर्नाटक पोलीस हे घटना स्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पर्यंत पळून गेलेल्या चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे चोरट्याचा शोध घेण्यास अडचणीत येतं होत्या. अद्याप पर्यंत बँकेतून एकूण किती सोने आणि रक्कम चोरीला गेली याची अधिकृत आकडेवारी माहिती आलेली नाही. मात्र कर्नाटकातील सर्वात मोठ्या दरोडापैकी हा दरोडा मानला जातोय. दोन महिन्यांपूर्वीच असा पद्धतीचा दरोडा याचं विजापूर जिल्ह्यातील कॅनरा बँकवर देखील पडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
























