Shikhar Bank Scam Case: अजित पवारांच्या अडचणी वाढल्या; शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लिनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार
Shikhar Bank Scam Case: शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Shikhar Bank Scam Case: शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या (Shikhar Bank Scam Case) अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) आव्हान देणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. तर 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांना दिलासा
राज्यातील बहुचर्चित तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या. पण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (इओडब्ल्यू) दिलासा दिला. तसेच, या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलें. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा देण्यात आला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना देखील या प्रकरणी दिलासा देण्यात आलेला. पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आलेले. क्लोजर रिपोर्ट सादर करतांना कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा देण्यात आलेला.