Anna Bhau Sathe : लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या कार्याचा रशियात गौरव, फडणवीसांच्या हस्ते होणार मॉस्कोतील पुतळ्याचं अनावरण
Russia : मॉस्कोत जगविख्यात व्यक्तींचे पुतळे बसवण्यात आले असून त्यामध्ये आता लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा समावेश झालेला आहे.
मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात येणार असून मॉस्कोमध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे पुढच्या आठवड्यात रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते 14 सप्टेंबरला या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे सुद्धा या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे. मॉस्को शहराच्या मध्यभागी एका प्रांगणात संस्थेच्या वतीने याआधी अनेक जगविख्यात व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये आता लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा समावेश झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
भारत-रशियाच्या संबंधाला 75 वर्षे पूर्ण
भारत-रशिया राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 व्या वर्षाला अनुसरून रशियात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ मॉस्कोमध्ये 14 आणि 15 सप्टेंबर रोजी ही परिषद घेण्यात येणार आहे. भारतातून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेबरोबरच मुंबई विद्यापीठाने या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे.
अण्णा भाऊंच्या साहित्यावर रशियन क्रांतीचा पगडा
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. रशियामध्ये लेनिनने केलेल्या कामगारांच्या क्रांतीने ते भारावले होते. तशाच पद्धतीची क्रांती ते भारतात आणण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये कामगार, दलित आणि उपेक्षित लोकांना केंद्रस्थान होतं. अण्णा भाऊंच्या साहित्यात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबर्या यांचा समावेश आहे.
अण्णा भाऊ साठेंनी दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर 'स्टॅलिनग्राडचा पोवाडा' ही दीर्घ काव्य रचना केली. युद्धांच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध आपण ज्याला स्टालिनग्राडचा लढा म्हणतो, ही दुसर्या महायुद्धातील सर्वात मोठी लढाई होती. आपण तिला युद्धाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणू शकतो अशी ती लढाई होती. या युद्धाला त्यांनी मानवतेच्या मुक्तीचे युद्ध असे नाव दिले आहे. रशिया या राष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यावर लिहिलेले. त्यातील सर्वसामान्य लोकांचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग यावर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच अण्णा भाऊंची रशियातील लोकप्रियता वाढली होती.