Anil Deshmukh : अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर तीन आरोपींनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू असून त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली आहे. चारही आरोपींना आता 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईडी कोर्टात ज्यावेळी सुनावणी असेल तेव्हा या सर्व आरोपीना हजर करावे लागणार आहे. या आधी अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे चारही आरोपींना पाच दिवासांची कोठडी वाढवून दिली होती. त्यामुळे 16 एप्रिलपर्यंत हे सर्व आरोपी सीबीआयच्या ताब्यात होते. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निर्णय दिला होता. अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नाहीत, ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह इतरांचीही कस्टडी वाढवून हवी असा युक्तीवाद सीबीआयने कोर्टात केला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरु केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केलेलं आहे. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र होतं. मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केलीय, ज्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
