Sassoon Hospital : 'ससून'मध्ये वजन कमी करण्याची सर्जरी करुन घ्या, देशमुखांचा सल्ला, मुश्रीफ हसत हसत म्हणाले, सर्जरी पेक्षा व्यायाम करतो
Sassoon Hospital : ससूनमधील गैरकारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हल्लाबोल केला.
मुंबई : गुन्हेगारांचा अड्डा आणि कृष्णकृत्यांमुळे लक्तरे वेशीवर टांगलेल्या पुण्यातील शासकीय ससून रुग्णालयाच्या कारभारावरून आज (4 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार अनिल देशमुख, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) हल्लाबोल केला. दोघांनी मिळून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती चांगलीच प्रश्नांची सरबत्ती केली. रवींद्र धंगेकर आणि देशमुख यांनी ससूनमधील गैरकारभाराचा पाढाच वाचला.
देशमुख साहेबांनी माझा फार विचार करण्याची गरज नाही
देशमुख यांनी वजन कमी करण्याच्या सर्जरीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आणि त्याचबरोबर मुश्रीफ साहेब पेशंट म्हणून तिथं जाणार का? अशी विचारणा केली. यानंतर मुश्रीफ यांनी सुद्धा खोचक शब्दामध्ये प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, वजन कमी केल्याने अडचण होते. माझं वजन जास्त आहे, पण सर्जरी करून वजन कमी करण्यापेक्षा मी व्यायाम करून वजन कमी केल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले. त्यामुळे देशमुख साहेबांनी माझा फार विचार करण्याची गरज नाही, असा टोला लगावला.
ससून गुन्हेगारांचा अड्डा झाला
दुसरीकडे धंगेकर यांनी सुद्धा ससूनच्या कारभारावरून वाभाडे काढले. ते म्हणाले की, मी ससून रुग्णालयामध्ये आठवड्यातून दोनदा जातो. माझा ससूनशी दररोजचा संबंध आहे. ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. मागील वेळी डॉक्टर पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? अशी विचारणार धंगेकर यांनी केली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन ससूनला भेट देऊ आणि सुधारणा करू, असे आश्वासन धंगेकर यांना दिले.
जिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार
दरम्यान, हसून मुश्रीफ यांनी दक्षिण मुंबईतील जीटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की 50 विद्यार्थी क्षमतेने हे महाविद्यालय यावर्षीपासून सुरू होत आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी 2012 मध्ये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्याची पूर्तता पूर्णपणे केली जाणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय कामा आणि जीटी रुग्णालयाशी संलग्न असेल. यासाठी डॉक्टरांच्या संख्या सुद्धा वाढवण्यात येईल, अशी माहिती सुद्धा मुश्रीफ यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या