(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Election : अमरावती पदवीधरच्या रणांगणात काँग्रेसची 'जीत', नेमका का झाला डॉ. रणजित पाटलांचा पराभव? वाचा सविस्तर
अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधर मतदारसंघ (Amravati Division Graduate Constituency) हा भाजपचा (Bjp) बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, आता इथं काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) हे विजयी झाले आहेत. धीरज लिंगाडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा 3 हजार 368 मतांनी पराभव केला आहे. बाद फेरीच्या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना 46 हजार 344 मते प्राप्त झाली, तर डॉ. रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा 47 हजार 101 इतका निश्चित करण्यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्वाधिक मते प्राप्त करून ते विजयी ठरले. मात्र, या सगळ्यात डॉ. रणजित पाटील यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत याची सविस्तर माहिती पाहुयात.
डॉ. रणजित पाटील यांच्या पराभवाने भाजपात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. रणजित पाटलांच्या पराभवानं भाजपात पुढच्या काळात मोठं वादळ उठण्याची शक्यता आहे. डॉ. रणजित पाटलांनी पाचही जिल्ह्यात पक्षसंघटनेवर केलेलं दुर्लक्ष आणि मतदारांसोबत नसलेला संपर्क त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला आहे.
कोण आहेत डॉ. रणजित पाटील
- अकोल्यात प्रख्यात अस्थीरोग तज्ञ आणि शल्यविशारद.
- 2010 पर्यंत भाजपाच्या वैद्यकीय आघाडीत विविध पदांवर काम
- डॉ. रणजित पाटील यांचे वडील विठ्ठलराव पाटील विधान परिषदेचे माजी आमदार
- 2010 मध्ये डॉ. रणजीत पाटील पहिल्यांदा अमरावती पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले होते.
2010 मध्ये तब्बल सहा टर्म्स 30 वर्ष आमदार असलेल्या अभ्यासू आमदार प्रा. बी. टी. देशमुखांचा पराभव करत ठरले होते 'जायंट किलर' - भाजपात देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक अशी ओळख.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात गृह, नगरविकास, बंदरे विकास, विधी आणि न्याय यासह तब्बल 12 खात्यांचे राज्यमंत्री - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 'शॅडो सीएम' अशी ओळख.
- राज्यमंत्री असताना अनेक वादांत अडकले. बेहिशेबी मालमत्ता, दोन ठिकाणी मतदारयादीत नाव, याबरोबरच वडिलांनी गावातील विरोधकांच्या महाविद्यालयात केलेली मारहाण
एका आदिवासीने जमीन बळकावल्याचा केलेला आरोपांमुळं रणजित पाटील आले होते अडचणीत - 2016 मध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी. काँग्रेसच्या संजय खोडकेंचा केला होता पराभव.
- अकोला जिल्ह्याच्या राजकारणात खासदार संजय धोत्रे गटासोबत प्रचंड राजकीय वैर.
मतमोजणीचे 'ते' 30 तास उत्सुकता आणि राजकीय नाट्याचे
मतमोजणीच्या तीस तासांच्या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना 43 हजार 340 तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 27 मते प्राप्त झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्यावेळी 2 हजार 313 मतांची होती. वैध मतांची संख्या ही 93 हजार 852 इतकी असल्याने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा हा 46 हजार 927 मते इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधीने अवैध ठरलेल्या 8 हजार 735 मतांची फेरमतमोजणी करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आली. त्यानुसार रात्री उशिरा या मतपत्रिकांची पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानंतर लिंगाडे यांची आघाडी ही 2 हजार 346 मतांवर पोहोचली. यातही डॉ. पाटील यांचे नुकसानच झाले. यानंतर मतांचा कोटा हा 47 हजार101 मतांवर पोहोचला
डॉ. रणजित पाटील यांच्या पराभवाची कारणे
1) डॉ. रणजीत पाटलांविरोधात अँटी-इन्कमबसी'
अमरावती पदवीधर मतदार संघातील डॉक्टर रणजित पाटील यांची ही तिसरी टर्म होती. मात्र, तिसऱ्या टर्मच्या वेळेस त्यांच्या 'हॅट्ट्रीक'चं स्वप्नं पदवीधर मतदारांनी अक्षरश: धुळीस मिळवलं. यावेळी तिसऱ्यांदा रिंगणात असल्याने डॉ. पाटलांविरोधात सुप्त विरोधी लाट होती. संपुर्ण निवडणुकीत ती स्पष्टपणे दिसली नसली तरी त्याचं प्रतिबिंब मतपेटीतून दिसलं. 2010 मध्ये प्रा. बी. टी. देशमुखांना हरवत डॉ. रणजित पाटील 'जायंट किलर' ठरले होते. त्यावेळी त्यांनी तब्बल 30 वर्ष आमदार असलेल्या बीटींसारख्या मातब्बराचा पराभव फार गाजला होता. मात्र, दोन टर्म आमदार झालेल्या रणजित पाटलांना मात्र तिसऱ्या टर्म्ससाठी नाकारलं. याला रणजित पाटलांचा कुणावरच विश्वास न ठेवणे, लोकांची साधी-साधी कामं न करणे, कार्यकर्त्याला बळ न देणे अशा गोष्टींमुळं मतदार आणि पक्ष पातळीवरही रोष होता. हाच रोष मतपेटीतून दिसल्यामुळं डॉ. रणजीत पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
मतदारांसह पक्ष पातळीवर कार्यकर्त्यांशी कमी असलेला संपर्क
डॉ. रणजित पाटलांना मतदारांच्या रोषासह पक्षाचे पाचही जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांचा रोष महागात पडला. पाचही जिल्ह्यात भाजपचे विधानसभेचे 15 आमदार, विधान परिषदेचे चार आमदार आणि एक खासदार आहे. मात्र, एखादा अपवाद सोडला तर रणजीत पाटलांचा कुणाशीच फारसा संवाद आणि समन्वय नव्हता. आधीच्या दोन निवडणुका कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकलेल्या पाटलांनी गेल्या सहा वर्षात कार्यकर्त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याची भावना होती. यामुळेच पाचही जिल्ह्यातील पक्ष संघटना अखेरपर्यंत जीव तोडून प्रचार प्रक्रियेत सहभागी झालीच नाही.
अकोला जिल्ह्याच्या राजकारणात खासदार संजय धोत्रे यांच्याशी विळ्या-भोपळ्याचं वैर
अकोला जिल्ह्यात भाजपात खासदार संजय धोत्रे यांचा एक गट अहे. तर दुसरा गट डॉ. रणजित पाटलांचा आहे. दोन्ही गटांत जिल्ह्यात प्रचंड वाद आहेत. मात्र, रणजित पाटील यांच्या गटात तेच एकमेव आमदार होते. तर अकोला जिल्ह्यात अतिशय शक्तीशाली असलेल्या खासदार गटात खासदारासह चार आमदार आहेत. तर पक्षसंघटनाही खासदार धोत्रे गटाच्या ताब्यात आहे. डॉ. रणजित पाटील पालकमंत्री असताना दोन्ही गटाचे पराकोटीचे वाद सार्वजनिकरित्या बाहेर आले होते. या निवडणुकीत पक्षशिस्त म्हणून धोत्रे गटानं डॉ. पाटलांचं काम केलंही. मात्र, निवडणुकीत झोकून देऊन काम करताना धोत्रे गट दिसला नाही. याला कारणही रणजित पाटलांचं अलिप्ततावादी आणि स्वत: पुरत्या राजकारणाची भूमिका ठरली. त्यामुळेच मतदारसंघात मतदान करून घेण्याबद्दल प्रचंड निरूत्साह दिसून आला. यातूनच 2016 मध्ये झालेल्या 63 टक्क्यांच्या तुलनेत यावेळी फक्त 49 टक्के मतदान झालं.
जुन्या पेन्शनधारकांच्या रोषाचा फटका
या निवडणुकीत डॉ. रणजित पाटलांना सर्वाधिक फटका बसला तो जुन्या पेन्शनधारकांच्या नाराजी आणि असंतोषाचा. जुनी पेन्शनची मागणी करणाऱ्या नोकरदार मतदारांनी आपली एकगठ्ठा मतं भरभरून महाविकास आघाडीच्या लिंगाडेंना दिली. याचा सर्वात मोठा फटका डॉ. रणजित पाटलांना बसला.
डॉ. रणजित पाटलांसमोर भविष्यातील आव्हानं मोठी
डॉ. रणजित पाटलांच्या या पराभवानंतर त्यांच्यासमोर भविष्यातील मोठी आव्हानं आहेत. सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचं. कारण, या पराभवानंतर अकोला जिल्ह्यात खासदार गट त्यांना नामोहरम करण्याची कोणतीच संधी सोडणार नाही. जनता आणि पक्षसंघटनेवर धोत्रे गटाची पकड असल्याने डॉ. पाटील यांना लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागतील. त्यातच डॉ. पाटलांकडे कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं नसल्याने पुढे त्यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: