Amravati : गुन्ह्याचा उलगडा करण्यात अमरावती पोलीस आयुक्तालय 'नंबर वन'
अमरावती शहर पोलीस आयुक्तालायने 2021 या वर्षात गुन्हे प्रकटीकरण अर्थात क्राईम डिटेक्शनमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
Amravati : एकीकडे खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांची लोकसभेत तक्रार देऊन त्यांच्यावर विशेषाधिकार हक्कभंग दाखल केले तर दुसरीकडे याच पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांच्या आयुक्त कार्यालयांनी 2021 या वर्षात प्रकटीकरण अर्थात डिटेक्शनमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे एकीकडे खासदार केंद्रात पोलिसांची तक्रार करतात तर दुसरीकडे हेच पोलीस राज्यात प्रथम क्रमांक पटकवतात.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालायने 2021 या वर्षात गुन्हे प्रकटीकरण अर्थात क्राईम डिटेक्शनमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्यातील इतर 11 पोलीस आयुक्त कार्यालयांना मागे टाकत अमरावती पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. अमरावती पोलिसांच्या या यशाला आणखी महत्व प्राप्त झाले आहे आणि त्याला कारण आहे. मागील काही दिवसांत अमरावती पोलिसांवर झालेल्या टीका आणि विविध आरोपांमुळे फक्त टीका आणि आरोपचं नाही तर अमरावतीच्या पोलीस आयुक्तांची तक्रार थेट लोकसभेत करण्यात आली. यासर्व अडचणींना तोंड देत अमरावती पोलीस आयुक्तालायने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे हे विशेष. नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांचे घटक प्रमुख उपस्थित होते. याबैठकीत अमरावती पोलिसांची कामगिरी सर्वोत्तम असण्यावर शिक्कामोर्तब झाले.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मागील काही दिवसांत अमरावती पोलिसांवर आरोपांची राळ उठवली आहे पोलिसांकडून राणा दाम्पत्यावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात खासदार राणा यांनी थेट लोकसभेच्या सचिवालयात विशेषाधिकारांचा भंग केल्याबाबत पोलीस आयुक्तांची तक्रार केली. अमरावती पोलीस कशा प्रकारे सूडबुद्धीने वागतात असं चित्र निर्माण करण्यात आलं आणि आता पोलिस आयुक्तांचे निलंबन केल्या शिवाय शांत बसणार नाही असा इशाराही देण्यात आला. मात्र एकीकडे या सर्व गोष्टी सुरू असताना अमरावती पोलीस राज्यात नंबर एकवर पोचण्यासाठी काम करत होते. या सर्व आरोपानंतर आता अमरावती शहर पोलीस राज्यात नंबर एक ठरले असल्याने पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचा उत्साह वाढला आहे. येणाऱ्या काळात देखील अमरावती पोलिसांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा.
राज्यात टॉप 5 पोलीस आयुक्त कार्यालयाची आकडेवारी-
पोलीस आयुक्तालाय | दाखल झाले गुन्हे | उघडकीस आलेले गुन्हे | टक्केवारी |
अमरावती | 9541 | 8477 | 88.85 |
औरंगाबाद | 7366 | 6283 | 85.30 |
मुंबई | 63610 | 52211 | 82.08 |
नागपूर | 13312 | 10292 | 77.31 |
मिरा भाईंदर | 8018 | 6123 | 76.08 |
इतर महत्त्वाच्या बातम्या: