Weather Forecast : बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी! राज्यासह देशभरात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
Weather News : महाराष्ट्रासह देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तुमच्या राज्यात आणि जिल्ह्यातील हवामान कसं असेल, वाचा सविस्तर.
IMD Weather Update : मान्सूनच्या (Monsoon) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून काही भागात पावसाचा धुमाकूळ (Rainfall Prediction) पाहायला मिळत आहे. आज अनंत चतुर्दशी (Ananta Chaturdashi) दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. आज 10 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार असून राज्यासह देशात ठिकठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशात आजपासून पुढील काही दिवस पावसाची शक्यता (India Meteorological Department) आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात 28 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज (Today Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह देशभरात पावसाचा अंदाज
राज्यासह देशभरात अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यासोबत आंध्रप्रदेश, कर्नाटक, झारंखड, बिहार या राज्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह राज्यात अनेक भागात आज वरुणराजा बरसणार आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. बीड, परभणी, सोलापूर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला येलो अलर्ट
हवामान खात्याने रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अतिवृष्टीचा) जारी केला आहे. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तासांत ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर, काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
देशभरात काही ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, आंध्रप्रदेशसह केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातील काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. यंदा मान्सून माघारी फिरण्यास काहीसा उशिर झाला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास यावर्षी आठ दिवस उशिराने सुरु झाला आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात
नैऋत्य मोसमी पाऊसही माघार परतण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम भारतातील आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.