(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharshtra New CM : नवे मुख्यमंत्री शिवसैनिक नाहीत, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Uddhav Thackrey On Eknath Shinde : आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Uddhav Thackrey On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरुन गुरुवारी सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नवीन मुख्यमंत्री हे शिवसैनिक नसल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'अडीच वर्षांपूर्वी अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर भाजपला अडीच वर्ष सत्ता मिळाली असती. पण त्यांने तसे काही केले नाही. पण शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्यांना त्यांना का मुख्यमंत्री केले? हा प्रश्न माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.'
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणारे सर्व आमदार आम्ही शिवसैनिक असल्याचा दावा करत आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यातच आता या प्रकरणावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवीन मुख्यमंत्री शिवसेनेचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितले. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नवे मुख्यमंत्री शिवसैनिक नाहीत -
आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला. अमित शाह आणि माझं जे ठरलं होत ते झालं असते तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. सगळं सन्मानानं झाले असते. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा किंवा भाजपचा झाला असता असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जे भाजपसोबत आज गेले, त्यांनी भाजपला प्रश्न विचारायला हवा असेही ते म्हणाले. तसेच लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार हवा. लोकशाहीचा घात करु नका, मतदारांच्या मतांचा आदर करा असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका - उद्धव ठाकरे
आरे कारशेडच्या निर्णायावरही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका.' आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. आरेत कारशेड उभारु नका असेही ठाकरे यावेळी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते असेही ठाकरे म्हणाले.
तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा होणार नाही
आता पाचही वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. ठरल्याप्रमाणं झालं असते तर भाजपचा अडीच वर्ष मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपला काय मिळाले, भाजपच्या मतदारांना काय आनंद मिळाला, यातून जनतेला काय मिळणार हे लवकरत कळेल असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या. माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मी ऋणी असल्याचे ठाकरे म्हणाले. माझं पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे. सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कदीही प्रतारणा करणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.