सावरकरांवर प्रेम असेल तर भाजपने अहमदाबादचं नाव सावरकरनगर करून दाखवावं; सुषमा अंधारे यांचे आव्हान
Sushma andhare on Savarkar Yatra : सावरकर यांच्यावर प्रेम असेल तर भाजपने सर्वात अगोदर अहमदाबादच नाव सावरकर नगर करून दाखवावं, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी भाजपला दिले.
Sushma andhare on Savarkar Yatra : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सावरकर यात्रेवरून भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. ती सावरकर गौरव यात्रा नसून ती अदानी बचाव यात्रा आहे ,ज्यांना अदानीवर प्रश्न विचारतील अशी भीती वाटते, त्यासाठी त्यांनी सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. त्यांना खरंच सावरकरांबद्दल प्रेम, असेल तर नाशिकमधील भगूर येथे भाजपने काय दिवे लावलेत? भगूरमध्ये का स्मारक का उभारले नाही? अशी विचारणा केली. सावरकर यांच्यावर प्रेम असेल तर भाजपने सर्वात अगोदर अहमदाबादचं नाव सावरकर नगर करून दाखवावं, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, किमान समान कार्यक्रमामुळे महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे संविधान मुल्यांची बूज राखण्याची एकत्र गरज आहे. ही लढाई भाजपच्या हुकूमशाही विरोधातील आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादावरूनही भाजपवर हल्ला चढवला. दंगलसदृश्य वातावरण तयार करण्यात भाजपचा हात आहे. भाजपनेच हे वातावरण तयार केलं आहे, जर हे भाजपने वातावरण तयार केलं नसेल तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत का?
मला तोंड उघडायला लावू नका
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पातळी सोडून सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी संजय शिरसाटांसारख्या भडगुंज्यावरती बोलण्याची माझी इच्छा नाही. ज्योतिराम पाटलाचे काय झाले?? मला तोंड उघडायला लावू नका. मला माझ्या पक्षप्रमुखांनी बोलण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे माझा पक्ष संकटात असताना मी बोलणार.
संभाजीनगरमध्ये 'सावरकर गौरव यात्रे'ला परवानगी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीची एकत्र सभा होत असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. मात्र, कालपर्यंत (1 एप्रिल) पोलिसांकडून या यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आज (2 एप्रिल) सकाळी अखेर पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांकडून काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावरकर गौरव यात्रा काढताना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला पोलिसांकडून देण्यात आलेल्या अटी आणि शर्ती पाळावे लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या