Imtiyaz Jaleel : शहरात पुन्हा राडा घडवण्याचा प्रयत्न, 'मविआ'च्या सभेपूर्वी जलील यांचं मोठं वक्तव्य
Imtiyaz Jaleel : महाविकास आघाडीने आधीच आपल्या सभेची घोषणा केली असतान, त्याच दिवशी पोलीस सावरकर गौरव यात्रेला कशी काय परवानगी देत आहे.
Imtiyaz Jaleel On Savarkar Gaurav Yatra : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात आज महाविकास आघाडीची वज्रमुठ यात्रा निघत असून, दुसरीकडे भाजप-शिंदे गटाकडून सावरकर गौरवा यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली जाणार आहे. दरम्यान याच सावरकर गौरव यात्रेवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे. शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना शहरातील शांतता बिघडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जलील म्हणाले आहे. तर राज्य आणि केंद्र सरकारमधील काही लोकं सावरकर गौरव यात्रा काढून शहरातील शांतता पुन्हा बिघडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
काय म्हणाले जलील...
शहरात झालेल्या राड्यानंतर आता शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र माणसापेक्षा काही लोकांसाठी राजकारण महत्वाचे आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील लोकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. मात्र तसे न करता हे लोकं सावरकर गौरव यात्रा काढून शहरातील शांतता पुन्हा बिघडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या बोगस लोकांसाठी शहरातील शांततेपेक्षा सत्ता महत्वाची आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीने आधीच आपल्या सभेची घोषणा केली असतान, त्याच दिवशी पोलीस या यात्रेला कशी काय परवानगी देत आहे. तसेच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी देखील या यात्रा काढणाऱ्या लोकांवर टाकली पाहिजे.
तर भाजप आणि शिंदे गटाला यात्रा काढण्यासाठी कोणाच्या दबावाखाली परवानगी देण्यात आली याचं उत्तर पोलीस आयुक्त यांनी दिले पाहिजे. काही गँगस्टर लोकांना त्यांचं घाणेरडे राजकारण करायचं आहे म्हणून, त्यासाठी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जाऊ शकत नाही. तर या सर्व प्रकार घडण्यामागचं कारण हे आहे की, जेव्हा तुम्ही शहरासाठी काही चांगले काम केल्याचं दाखवण्यासारखं काहीही नसते, तेव्हा तुम्ही लोकांना भावनिक आणि जातीय मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आजही तेच करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या लोकांच्या खेळाला बळी न पडता शांत राहावे, असे जलील म्हणाले.
भाजप आणि शिंदे गट क्रिमिनल गँगस्टर आहेत
शहरात अशांतता निर्माण होण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहे. त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी परवानगी दिली, इथल्या मंत्र्याची लायकी नाही. तर आजच्या ऐवजी सावरकर यात्रेला उद्याही परवानगी देता आली असती. महाविकास आघाडीला आधी परवानगी दिल्यानं त्यांनी प्रक्षोभक भाषण टाळून सभा घेण्यास हरकत नाही. मात्र त्याचवेळी दोन्ही पक्षांच्या राजकीय कार्यक्रमाना परवानगी कशी दिली. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गट सत्ताधारी आहेत त्यांची जास्त जबाबदारी आहे, मात्र त्यांना नागरिकांची काळजी नाही, असे जलील म्हणाले. तर भाजप आणि शिंदे गट क्रिमिनल गँगस्टर असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: